थापा बंद करा, तीर्थक्षेत्राच्या मार्गातले खड्डे बुजवा! राष्ट्रीय महामार्गावर ग्रामस्थांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे जाणाऱ्या मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाट, तळेघर ते भीमाशंकर यादरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग धोकादायक झाला असल्याने या रस्त्याच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, बिरसा ब्रिगेड, किसान सभा आंबेगाव तालुका आणि ट्रायबल फोरम यांनी तळेघर येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.

‘विकास आराखड्याच्या थापा बंद करा, तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरचे खड्डे बुजवा’, ‘बैठका आणि भूलथापा खूप झाल्या, आता हिरडा खरेदी सुरू करा’ अशा घोषणा देत विविध पक्ष, संघटना आणि आदिवासी बांधवांनी तळेघर येथे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, बाळासाहेब बाणखेले, धोंडीभाऊ भोर, पूजा वळसे, किसान सभेचे सचिव अशोक पेकारी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष सखाराम हिले, लखन पारधी, कृष्णा वडेकर आदी उपस्थित होते.

भीमाशंकरकडे जाताना अनेक लहान-मोठे खड्डे चुकवत जावे लागत आहे. या कसरतीच्या प्रवासात खड्डे चुकवत असताना दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून, दुचाकींवरील लहान मुले, महिलांना दुखापतींना सामोरे जावे लागत आहे. काहीजणांचा बळीदेखील गेला आहे. चारचाकी वाहनाचा टायर फुटणे, पंक्चर होणे आदी घटना घडत असल्याने या रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत, तसेच यादरम्यान असलेल्या वेड्यावाकड्या वळणांवरील झाडे-झुडपे, रिप्लेक्टर, दिशादर्शक फलक, साइड पट्टी आदी कामे राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्वरित करावीत. तसेच आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शेतकऱ्यांकडे हिरडा वनस्पतीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, शासनाकडून हिरडा खरेदी बंद असल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी त्वरित हिरडा खरेदी सुरू करावी, अशी मागणी ‘रास्ता रोको’ आंदोलनादरम्यान करण्यात आली. आदिवासी विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.