
अहमदपूर येथील तहसील कार्यालयाचे स्वस्त धान्य गोदाम रक्षकाला गोदामाच्या आवारात शुक्रवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने पैशांची मागणी करत धमकी दिली आणि त्यांना मारहाण केली. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात त्या व्यक्तीविरोधात खंडणी, शासकीय कामात अडथळा आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
अहमदपूर तहसील कार्यालयात राजकुमार सूर्यकांत भगत धान्य गोदाम किपर म्हणून नोकरीला आहेत. शुक्रवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास सुभाष सोनकांबळे आपल्या गोडाऊनमध्ये आला. त्याने 10 हजार रुपये खंडणीची मागणी करत धान्याची लूट करण्याचा प्रयत्न केला. आपण दहा हजार रुपयाची खंडणी देण्यास नकार दिला. तसेच धान्याची लूट करण्यास त्याला विरोध केला. त्यावेळी त्याने आपल्याला मारहाण केली, त्याने केलेल्या मारहाणीत आपण बेशुद्ध पडल्याचे भगत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्याने आपल्याला ठार मारण्याची धमकी दिल्याचेही भगत यांनी सांगितले. त्यांच्या तक्रारीनुसार अहमदपूर पोलीस ठाण्यात सुभाष सोनकांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.






























































