अमरधाम परिसरात मोकाट कुत्र्यांनी मृतदेह उकरून काढला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

अमरधाम स्मशानभूमी येथील दफन करण्यात आलेल्या लहान बालकाचा मृतदेह मोकाट कुत्र्यांनी उकरून काढल्याची गंभीर घटना मंगळवारी (दि.९) सकाळी उघडकीस आली आहे. परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी हा मृतदेह पुन्हा दफन केल्याचे तेथील सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. अमरधाम परिसरातही कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून यामुळे दफन केलेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी सकाळी अमरधाम स्मशानभूमीत दशक्रिया विधी होणाऱ्या परिसरात लहान बालकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी हा मृतदेह पुन्हा दफन केला.

बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावली जात असताना वरचेवर मृतदेह पुरले जातात. कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट असल्यामुळे अधून-मधून असे प्रकार घडत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे कुठल्याही शासकीय यंत्रणेकडे या घटनेची नोंद नसल्याचे समजते. मनपा प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

summary- stray dogs created chaos at nagar