
सप्टेंबर महिन्यात हृदयविकाराच्या धक्क्याने लेफ्टनंट कर्नल आणि कर्नल दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हे सर्व लष्करी अधिकारी 40 ते 45 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षात लष्करातील राहणीमान ’क्वालिटी ऑफ लाईफ’ बदललंय. त्यातूनच अधिकारी, जवानांमध्ये ताणतणाव आणि नकारात्मकतेची भावना निर्माण होत आहे. दरवर्षी साधारण 1600 जवान युद्धात नव्हे तर अन्य कारणांमुळे मृत्यूमुखी पडत असल्याचे एका अभ्यासातून समोर आलंय.
सैनिकाचं आयुष्य म्हटलं की तणाव आलाच. मात्र गेल्या काही वर्षांत जवानांमधील तणावाचा मुद्दा मोठय़ा प्रमाणात समोर आलाय. जवानांवर नकारात्मक भावनेचा परिणाम होऊ नये, यासाठी पुरेशी काळजी घेतली जात असली तरी परिस्थिती बिघडल्याचे दिसत आहे. 30 ते 40 वर्षे वयोगटातील लष्करी अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियांवर अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अधिकाऱ्यांना सुट्ट्या न मिळणे, मिळाल्या तरी रद्द होणे आणि या साऱ्यांचा त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत असल्याचे अहवालातून दिसून आले आहे.
युवकांचे म्हणणे काय?
संशोधन अहवालात सहभागी झालेल्या युवकांच्या मते, वर्क लाईफचे संतुलन राखणे सोपे नाही. कारण तंत्रज्ञानाचा प्रभाव आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूवर पडत असतो. प्रत्येकाला कामाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्यामुळे मनाप्रमाणे काम करता येईल. अडचणींवर मात करण्यासाठी काही सूट दिली पाहिजे. तसे झाले नाही तर आपण स्वतःला कमकुवत समजू लागतो आणि क्रिएटिव्हिटीपासून दूर जातो.
चूक मान्य न करण्याची सवय दूर केली पाहिजे. त्यामुळे कमी वयात अधिकारी हृदयविकाराने मृत्यूमुखी पडण्यापासून वाचू शकतील. त्यासोबतच झिरो एरर सिंड्रोम संपवणे तितकेच गरजेचे असल्याचे मत अभ्यासात सहभागी तरुणांनी व्यक्त केले.
काय सांगतो अहवाल
- 87 टक्के लष्करी अधिकारी कामाच्या दबावामुळे सुट्टी घेऊ शकत नाहीत.
- जरी त्यांनी सुट्टी घेतली तरी कामामुळे ती रद्द करून परतावे लागते, अशी प्रतिक्रिया 73 टक्के अधिकाऱ्यांनी दिली
- 63 टक्के लष्करी अधिकाऱ्यांनी वैवाहिक जीवनावर परिणाम होत असल्याचे सांगितले.
- 85 टक्केंच्या मते जेवतानाही कामाच्या कॉलला उत्तर द्यावे लागते.
झीरो एरर सिंड्रोम
79 टक्के लष्करी अधिकाऱ्यांच्या मते त्यांना नेहमी अचूक रहावे लागते. कोणतीही चूक त्यांच्या हातून झालेली चालत नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हीच त्यांची जबाबदारी असते. झीरो एरर सिंड्रोममुळे तणाव वाढतो.
तंत्रज्ञानाचा भाडीमार
फोन किंवा टॅबलेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करताना शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर नकारात्मक प्रभाव पडतो. 40 टक्के अधिकाऱ्यांनी मान्य केलंय की ते ’कॉन्स्टंट चेकर्स’ आहेत. तर 60 टक्के अधिकारी फोन किंवा टॅबलेटशी नेहमीच जोडलेले असतात.



























































