गोदावरी नदी प्रदुषित करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोदावरी नदीपात्र प्रदुषणमुक्त रहावे यासाठी नाशिक पोलिसांनी नदीच्या स्वच्छतेसाठी एक पाऊल उचलले आहे. नदीपात्रात कुणीही कचरा, प्लॅस्टिक पिशव्या टाकताना आढळल्यास अथवा कपडे, वाहने धुताना दिसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत शहर पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी तसे प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत.

नाशिक पोलिसांच्या परिमंडळ-1 च्या कार्यक्षेत्रात गोदावरी प्रदुषण मुक्तीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. गोदावरी नदी प्रदुषणमुक्त असावी यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ‘हरितकुंभ’ संकल्पना तयार करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालय परिमंडळ-1 च्या कार्यक्षेत्रातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गोदावरी नदीचे पात्र आहे. नदीकिनारी कपडे, वाहन धुणे तसेच नदीपात्रात कचरा, प्लॉqस्टकच्या पिशव्या टाकणे, याप्रकारे नदी प्रदुषित करणारे कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.