
‘राज्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कोरोना निर्बंधांची अंमलबजावणी 15 मेपर्यंत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, जिल्ह्यातही 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात येईल. त्यानंतर राज्य शासनाच्या भूमिकेनुसार जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे मत लक्षात घेऊन जिल्ह्यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल,’ असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या, बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटरची उपलब्धतता, लसीकरण, लॉकडाऊन अंमलबजावणी आदी सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला. आणखी व्हेंटिलेटर्स वाढविण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी एकमुखाने मागणी केली. व्हेंटिलेटर बेड उपलब्धतेबाबत कॉल सेंटरला त्वरित माहिती उपलब्ध झाली पाहिजे व रुग्णाला व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी यंत्रणांमध्ये अत्यंत काटेकोर समन्वय असणे आवश्यक आहे. जिल्ह्याला दोन दिवसांमध्ये अधिकचे 30 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार असून, राज्य शासनाकडे आणखी 20 ते 25 व्हेंटिलेटर्सची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्याला आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर्सची तत्काळ खरेदी करावी.
खरेदी प्रक्रियेपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून व्हेंटिलेटर्सची खरेदी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, असा आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिला.
सातारा जिल्ह्यातही 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन
सातारा जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. कोरोना पॉझिटिव्हचा दर अपेक्षित प्रमाणात कमी न आल्यामुळे लॉकडाऊनची मुदत आणखी पाच दिवस वाढविण्यात आली असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने 4 ते 10 मे या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. तेव्हापासून दररोजची रुग्णसंख्या समाधानकारकरीत्या कमी झालेली नसली, तरी पॉझिटिव्ह दर ज्या प्रमाणात कमी येणे अपेक्षित होते, त्या प्रमाणात कमी आलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे.
सहा लाख नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात आत्तापर्यंत पाच लाख 98 हजार 386 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस पाच लाख 17 हजार 92, तर दुसरा डोस 80 हजार 794 जणांचा झाला आहे. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, अशांना विहित मुदतीत दुसरा डोस द्यावा. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरणाचे डोस मिळविण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करू, असे सांगितले. लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीत नोंदी करून जेवढे डोस उपलब्ध आहेत, तेवढय़ाच लोकांना लसीकरणासाठी बोलवावे व गर्दी टाळावी, अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली.
रुग्णसंख्येच्या प्रमाणात ‘रेमडेसिविर’चा पुरवठा व्हावा
जिल्ह्याला सध्या प्रतिदिन 44 मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर झाला असून, हा ऑक्सिजन जेमतेम पुरविण्यात येत आहे. ऑक्सिजन व ‘रेमडेसिविर’चा पुरवठा या दोन बाबींचे फार मोठे आव्हान असून, राज्यांना रुग्णसंख्येच्या प्रमाणात ‘रेमडेसिविर’चा पुरवठा व्हावा,’ अशी मागणी केंद्राकडे करण्यात आल्याचेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
























































