इराणमध्ये ‘जेन-झी’ रस्त्यावर, सुरक्षा दलांसोबतच्या संघर्षात 7 जणांचा मृत्यू; महागाईविरोधात तीव्र आंदोलन 

इराणमध्ये महागाईविरोधात जेन झेड’  रस्त्यावर उतरली असून आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. संतप्त आंदोलकांनी फासा या शहरात सरकारी कार्यालयात घुसून प्रचंड तोडफोड केली. याशिवाय राजधानी तेहरानमध्येही आंदोलकांनी प्रचंड धुडगूस घातला. 28 डिसेंबरपासून सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण कोम या इराणमधील पवित्र शहरापर्यंत पसरले आहे.

इराणमध्ये जेन झेड महागाईविरोधात आक्रमक झाली आहे. इराणचे चलन रियाल याची प्रचंड घसरण झाली आहे. डिसेंबरमध्ये एका अमेरिकन डॉलरसाठी 1.45 रियाल मोजावे लागत होते. ही आतापर्यंतची नीचांकी पातळी होती. खाद्यपदार्थ 72 टक्के तर, औषधी 50 टक्क्यांनी महागल्या आहेत. याशिवाय सरकारने नव्या वर्षात 62 टक्के करवाढ प्रस्तावित केली आहे. त्यामुळे सरकारवर तरुण पिढी प्रचंड नाराज आहे. तरुणाईने 28 डिसेंबरपासून रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले आहे. त्यात 31 डिसेंबर रोजी एकाचा तर, 1 जानेवारी रोजी 5 आंदोलकांचा गोळीबारात मृत्यू झाला. या संघर्षात एका सुरक्षा कर्मचाऱयाचाही मृत्यू झाला आहे.

आंदोलक देशातील कट्टरपंथी सरकार बरखास्त करून परत राजेशाही आणण्याची मागणी करत आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजेशकियान यांनी हे आंदोलन परदेशी शक्तींनी घडवून आणल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. देशात फूट पाडण्याचे हे कारस्थान असल्याचेही ते म्हणाले.

राजेशाहीविरोधात नारेबाजी

इराणची राजधानी तेहरान येथे व्यापाऱयांनी सर्वप्रथम आंदोलनाला सुरूवात केली होती. त्यात आता ‘जेन झेड’ मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरली आहे. हे लोण आता कोम या इराणच्या पवित्र शहरापर्यंत पोहोचले आहे. कोम हे शिया धर्मगुरूंचा गड असलेले शहर आहे. त्यामुळे या शहराला वेगळे महत्त्व आहे. आंदोलकांनी या शहरात राजेशाहीविरोधात जोरदार नारेबाजी केली.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱयांची हत्या केल्यास अमेरिका कारवाईसाठी सज्ज आहे, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. टथ या सोशल मीडियावर ट्रम्प यांनी लिहिले की, इराण जर शांततेने आंदोलन करणाऱयांवर गोळीबार करेल किंवा त्यांची निर्दयी हत्या करेल तर अमेरिका त्यांच्या मदतीसाठी पुढे येईल.