हरवलेले प्रेम परत मिळविण्याचा आटापिटा भोवला; राजस्थानमधील भामट्यांनी तरुणीला फसवले, गुन्हे शाखेने दोघांना पकडले

घरच्यांच्या विरोधामुळे तिचे प्रियकरासोबतचे बोलणे, गाठीभेटी बंद झाल्या होत्या. त्यामुळे ती प्रचंड बेचैन झाली होती. त्यात तिला इन्स्टाग्रामवर ‘खोया हुआ प्यार पाये 24 घंटे मै’ अशी पोस्ट दिसल्याने मुलीने त्यावर संपर्क केला. मग संबंधितांनी त्या मुलीला शिताफीने आपल्या जाळ्यात ओढून तिची लाखो रुपयांची फसवणूक केली. पण हा प्रकार समोर येताच गुन्हे शाखेने तपास करून राजस्थानातील दोघा भामटय़ांच्या मुसक्या आवळल्या.

अश्लेषा (नाव बदललेले)  हिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. परंतू घरच्यांचा त्यांना विरोध होता. त्यामुळे प्रियकराने बोलणे बंद केले. शिवाय गाठीभेटीदेखील बंद झाल्या. त्यातून मुलीला प्रचंड नैराश्य आले. तिला पुन्हा प्रियकराशी सूत जुळवून घ्यायचे होते. त्यातच तिला इन्स्टाग्रामवर ‘खोया हुआ प्यार पाये 24 घंटे मै’ अशा विविध पोस्ट तिच्या नजरेस पडल्या. तिने लगेच त्या इन्स्टापेजवर आपला मोबाईल नंबर संपका&साठी दिला. त्यानंतर ते इन्स्टापेज चालविणाऱयांनी मुलीला भावनिक करत तिला आपल्या जाळ्यात ओढले. मग तिच्या मदतीने त्या भामटय़ांनी मुलीच्या घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा 16 लाख 18 किमतीचा ऐवज काढून घेतला. दरम्यान, आपल्या घरात चोरी झाल्याचा समज करत मुलीच्या आईने पायधुणी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने संमातर तपास सुरू केला.

खोया हुआ प्यार मिळवून देणारे राजस्थानचे भामटे

प्रभारी निरीक्षक दिलीप तेजनकर, निरीक्षक रवींद्र मांजरे, प्रशांत गावडे व पथकाने तपास केला असता तक्रारदार महिलेच्या मुलीला  राजस्थानातील काही भामटय़ांनी तिच्या प्रियकराची पुन्हा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकरवी 16 लाख 18 हजार गैरमार्गाने घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने राजस्थान गाठून विकास मेघवाल (22) आणि मनोज नागपाल (30) अशा दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून फसवणूक केलेले सोने व रोकड असा 16 लाख 18 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.