एसटीच्या 5016 जादा गाडय़ांचे बुकिंग ‘फुल्ल’

ठाण्यातील गणेशभक्तांनी कोकणात जाण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेला प्रचंड गर्दी होऊ लागल्याने मुंबईकर-ठाणेकरांनी एसटी महामंडळाच्या जादा गाडय़ांना पसंती दिली आहे. गुरुवारपर्यंत एसटीच्या 5016 जादा गाडय़ांचे बुकिंग फुल्ल झाले. मुंबई, ठाणे, पालघर परिसरातून या गाडय़ा सुटणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या गावोगावी पोहोचणार आहेत.

अनेक गावांना रेल्वे प्रवास सोयीचा नसल्याने कित्येक गणेशभक्त कुटुंबे ‘लालपरी’तून प्रवास करून गाव गाठतात. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदा जादा गाडय़ांची व्यवस्था केली आहे. त्या गाडय़ांना गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे स्पष्ट होत आहे. महामंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारपर्यंत मुंबई विभागातून सुटणाऱया 1809, ठाणे विभागातून 2671 आणि पालघर विभागातून 536 जादा बसगाडय़ांचे बुकिंग ‘फुल्ल’ झाले आहे. ग्रुप बुकिंगच्या माध्यमातूनही महामंडळाच्या जादा गाडय़ांना मोठा प्रतिसाद लाभल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.