
कोट्यवधी रुपयांच्या तोटय़ाखाली दबलेल्या एसटी महामंडळाला दिवाळीच्या दहा दिवसांत 301 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. दररोज सरासरी 30 कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा झाला. पुणे विभागाने प्रवासी सेवेतून सर्वाधिक 20 कोटी 47 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले.
एसटीने 18 ते 27 ऑक्टोबर या दिवाळीच्या दिवसांत राज्याच्या कानाकोपऱयात सेवा दिली. दिवाळीत इतर दिवसांच्या तुलनेत भाऊबीजच्या दिवशी बसगाडय़ांना चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे दहा दिवसांतील उत्पन्न 301 कोटी रुपयांवर गेले. यात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले. त्यापाठोपाठ जळगाव विभागाने 15 कोटी 60 लाख रुपये, तर नाशिक विभागाने 15 कोटी 41 लाख रुपये उत्पन्न मिळवले. दिवाळी सुट्टीच्या परतीच्या दिवशी, 27 ऑक्टोबरला महामंडळाने 39 कोटी 75 लाख रुपये उत्पन्नाचा चालू वर्षातील नवा विक्रम केला.
महामंडळाच्या कामगिरीवर परिवहनमंत्री मात्र नाराज
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये दररोज 34 कोटी रुपयांप्रमाणे 1049 कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. ते उद्दिष्ट गाठता आले नाही. त्यामुळे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अत्यंत सुमार कामगिरी करणाऱया विभागांवर नाराजी व्यक्त केली. सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशीव या विभागांनी दिवाळीत अत्यंत सुमार कामगिरी केल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
सरकारकडूनच निराशा, कामगारांमध्ये असंतोष
परिवहनमंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या काही विभागांतील कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. परिवहनमंत्र्यांच्या अपेक्षेवर कामगार वर्गातून टीका केली जात आहे. परिवहनमंत्र्यांची नाराजी हा प्रामाणिक काम केलेल्या कामगारांचा अपमान आहे. जे सरकार कामगारांकडून मोठय़ा अपेक्षा ठेवतेय त्या सरकारने दिवाळी भेट देताना एसटी कामगारांना सापत्न वागणूक दिली, अशा शब्दांत कामगारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.






























































