
मुंबईतून राज्याच्या विविध भागांत धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसेस सेवेची अवस्था बिकट बनली आहे. शिवशाही बसेस अर्ध्या प्रवासात ब्रेकडाऊन होऊन बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच आरामदायी सेवा म्हणून प्रवासीसेवेत दाखल झालेल्या या बसेसमधील एसी नादुरुस्त होण्याच्या तक्रारीही अधिक आहे. त्यामुळे ‘शिवशाही’कडे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.
एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाकडे सध्या एकूण 32 शिवशाही बसेस आहेत. यापैकी दोन बसेस कित्येक दिवसांपासून बंद आहेत, तर उर्वरित 30 शिवशाही बसेस राज्याच्या विविध मार्गांवर धावत आहेत. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला आगारांतून या शिवशाही बसेस पुणे, अलिबाग, दापोली, नारायणगाव, सातारा, धुळे आदी विविध विभागांत धावतात. आरामदायी प्रवासासाठी नागरिक शिवशाही बसेसचे जास्त दराचे तिकीट काढतात. मात्र गाडय़ांमध्ये एसीचा गारवा मिळत नाही. त्यातच अर्ध्या प्रवासात गाड्या ब्रेकडाऊन होत आहेत. काही दिवसांपूर्वी माटुंगा येथे शिवशाही बसमध्ये अचानक धूर आला आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. गाड्या ब्रेकडाऊन होण्याचे वाढते प्रमाण तसेच सुरक्षेबाबत निर्माण झालेली धाकधूक यामुळे प्रवाशांनी शिवशाही बस सेवेकडे पाठ फिरवली आहे. राज्यात 2017 मध्ये मोठय़ा दिमाखात सुरू झालेल्या शिवशाही बस सेवेचे चाक महायुती सरकारच्या काळात डळमळीत झाले आहे. सरकार शिवशाही बसेसच्या देखभालीकडे दुर्लक्ष का करतेय, असा सवाल मुंबईकर प्रवासी विचारत आहेत.
गाड्या बंद पडण्यामागील कारणांची चौकशी करणार
शिवशाहीमध्ये एसी नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. एसीमध्ये झालेल्या बिघाडामुळे गाड्या ब्रेकडाऊन होत आहेत. मात्र अनेक शिवशाही बसेस 5 ते 7 वर्षे जुन्या आहेत. असे असताना गाड्या अर्ध्या प्रवासात का बंद पडत आहेत? चालकांकडून जाणूनबुजून गाड्या ब्रेकडाऊन केल्या जात आहेत का? याची चौकशी करणार आहोत, अशी प्रतिक्रिया एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली.



























































