अकरावी प्रवेशास मुदतवाढ, 16 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरी 2 ला मुदतवाढ देण्यात आली आहे. काही अपरिहार्य कारणामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी विद्यार्थ्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश अर्ज भरण्यास तसेच काॅलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करण्याची आणखी एक संधी दिली जाणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले, ‘ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करायचा आहे त्यांना 15 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरी 2 अंतर्गत 16 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश अर्ज करू शकतात. तसेच काॅलेज अलॉट झाल्यावर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित काॅलेजमध्ये जाऊन विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करू शकतात. प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी असून विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश दिलेल्या मुदतीत घ्यावा, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

बारावीचे विद्यार्थीही करू शकतात , जेईई परीक्षेसाठी नोंदणी

बारावीचे विद्यार्थीही जेईई परीक्षेच्या मे महिन्यातील सत्रासाठी नोंदणी करू शकतात असे राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) जाहीर केले आहे. जेईई मेन परीक्षा यंदापासून चार वेळा घेण्यात येणार आहे. चौथ्या सत्रातील परीक्षा 24 ते 28 मे दरम्यान घेण्यात येणार आहे. सीबीएसई आणि विविध राज्य मंडळांच्या बारावीच्या परीक्षा आणि जेईई परीक्षा एकाच कालावधीत येऊ नयेत म्हणून यावेळी एनटीएने काळजी घेतली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 ते 12 मे दरम्यान अर्ज करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांना एनटीएकडे त्यांचा बारावीचा रोल नंबर आणि शिक्षण मंडळाचे नाव द्यावे लागणार आहे.