नगर जिल्ह्यातील नवोदयचे ते 18 जण विद्यालयातच क्वॉरंटाईन

641

केंद्र सरकारच्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील उत्तर प्रदेशमधील उन्नावला गेलेले 16 विद्यार्थी आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नानंतर एसटी बसने टाकळी ढोकेश्‍वरला पोहोचले असून त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. जवाहर नवोदय विद्यालयातील 16 विद्यार्थी इयत्ता 9 वीच्या आदान प्रदान अभ्यासक्रासाठी गेले होते. तर उन्नाव येथील 23 विद्यार्थी इयत्ता 9 तील शिक्षणासाठी गेल्या वर्षाच्या अंतर्गत आदान प्रदान अभ्यासक्रमासाठी टाकळी ढोकेश्‍वरला आले होते.

एप्रिलअखेर नगरचे विद्यार्थी उन्नावला तर उन्नावचे विद्यार्थी नगरला येणार होते. मात्र, देशभरात 24 मार्चपासून लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने हे सर्व विद्यार्थी अडकून पडले होते. जवाहर नवोदय विद्यालयाचे चेअरमन तथा जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी यांनी उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशातील उन्नावला जाण्याची परवानगी दिली. तर नगर येथील उन्नावला असणारे विद्यार्थी परत नगरला सोडण्यासाठी परवानगी घेतली होती. त्यानुसार उन्नाव येथून 3 मे रोजी सकाळी 8 वाजता जवाहर नवोदय विद्यालयातील 16 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना घेवून एसटी महामंडळाची बस मध्यप्रदेशला रविवारी रात्री पोहोचली. तर नगरहून उन्नावला जाणाऱ्या 23 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक रविवारी रात्री मध्यप्रदेशला पोहोचले. तेथून बसमधील विद्यार्थी अल्टरनेट करून नगरचे उन्नावकडे तर उन्नावचे नगरकडे आले. सोमवारी रात्री 11 वाजता टाकळी ढोकेश्‍वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात पोहोचल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी निश्‍वास टाकला आहे. 16 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना विद्यालयातच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या