
झटपट पैसा कमावण्यासाठी ताडदेव येथे राहणाऱया एका विद्यार्थ्याने गावदेवी परिसरातील युनियन बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, पण आटापिटा करूनही त्याच्या हाती पैसे लागला नाही. अखेर गावदेवी पोलिसांनी त्याला अटक केली.
रितेश भारती (20) असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो ताडदेव येथे कुटुंबीयांसोबत राहतो. 28 ऑगस्टच्या पहाटे 2.30 च्या सुमारास गावदेवी येथील गोवालिया टँक परिसरात असलेले युनियन बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला होता. हा प्रकार दुसऱया दिवशी उघडकीस येताच बँकेच्या व्यवस्थापकाने गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक दत्ताराम गिरप यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्रीनिवास दराडे तसेच नरेंद्र कांबळे, विवेक तोडणकर, कदम, अवधूत राणे या पथकाने तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चेहऱयावर रुमाल बांधलेला टीशर्ट व हाफ चड्डी घातलेला तरुण एटीएम मशीन फोडत असताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी गावदेवी व ताडदेव परिसरातील जवळपास 100 सीसीटीव्ही फुटेज तपासले. शिवाय तांत्रिक बाबी व खबऱयांच्या मदतीने शोध घेत रितेश भारती याला अटक केली.
शिक्षण घेत असलेला रितेश वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करतो, पण दुप्पट पैसा मिळविण्याच्या नादात त्याने एटीएम मशीनच फोडण्याचा प्रयत्न केला आणि लटकला.
































































