विद्यापीठाच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फटका, ग्रेडच्या आधारावर प्रवेश मिळण्यास समस्या

सामना प्रतिनिधी । मुंबई

परीक्षेच्या निकालपत्रावर गुणांऐवजी ग्रेड देण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या नव्या पद्धतीचा फटका विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना बसत आहे. ग्रेडच्या आधारावर प्रवेश नाकारले जात आहेत. ग्रेडऐवजी किती गुण मिळाले त्याचा पुरावा घेऊन या, असे उत्तर विद्यार्थ्यांना मिळत असल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गात चिंता व्यक्त होत आहे.

मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या निकालपत्रावर गुणांऐवजी ग्रेड देण्यात यावेत असे निर्देश महाविद्यालयांना दिले होते. 60 ते 70 टक्के गुण असणार्‍या विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेड, 70 ते 80 टक्के गुण असणार्‍या विद्यार्थ्यांना ‘ए प्लस’ असे ठरावीक टक्केवारीनुसार ग्रेड ठरवण्यात आले होते, परंतु त्या ग्रेडच्या आधारावर प्रवेश देणे विद्यापीठालाही आता अडचणीचे ठरू लागले आहे. कारण एकच ग्रेड मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुण मात्र वेगवेगळे असतात. त्यामुळे ग्रेडच्या आधारावर मेरिट लिस्ट बनवणे अवघड जात आहे. परिणामी प्रवेशासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना त्याच कारणास्तव गुणपत्रिका घेऊन येण्याचा आग्रह करणे भाग पडत आहे.

एमए सायकॉलॉजी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याला असा अनुभव आला. त्याला ग्रेडऐवजी सहा सेमिस्टरला मिळालेल्या गुणांचा पुरावा घेऊन ये असे उत्तर विद्यापीठातील अधिकाऱयांनी दिले. त्या गुणपत्रिका मिळवण्यासाठी त्याला महाविद्यालयात अनेक हेलपाटे घालावे लागले. ही केवळ एकाच विद्यार्थ्याची अडचण नव्हे तर शेकडो विद्यार्थ्यांना अशाच अनुभवाला सामोरे जावे लागत आहे.  

निकालपत्रावर ग्रेडबरोबर गुणांचाही उल्लेख करावा अशी मागणी आम्ही कुलगुरू सुहास पेडणेकर आणि विद्यापीठाचे निबंधक देशमुख यांच्याकडे केली होती, परंतु अद्याप त्यावर काहीच निर्णय झालेला नाही. विद्यापीठाने यासंदर्भात तत्काळ परिपत्रक काढावे. –ऍड. मनोज टेकाडे, अध्यक्ष, प्रहार विद्यार्थी संघटना