दोन लाख द्या नाहीतर पुलवामासारखा हल्ला करेन, विद्यार्थ्याचे शाळेला पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील एका शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेला पत्र लिहून शाळेची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. या विद्यार्थ्याने शाळेकडून दोन लाख रुपयांची खंडणी देखील मागितली आहे. य़ा प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये बरेली मध्ये असलेल्या या शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने मुख्यध्यापकाला पत्र लिहून शाळेत बॉम्ब पेरल्याचे सांगितले. तसेच दोन लाख रुपये दिले नाही तर तासाभरात शाळेची पुलवामा सारखी अवस्था करू, असे सांगितले. विद्यार्थ्याचे धमकीचे पत्र मिळाल्यानंतर शाळेत एकच खळबळ उडाली. तत्काळ मुख्यध्यापकांनी पोलिसांना बोलावले व शाळेतील सर्व 400 विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविले.

दरम्यान बॉम्बशोधक पथकाला शाळेत काहीच आढळून आले नाही. त्यामुळे कुणीतरी शाळेला खोटी धमकी दिल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे बुधवारी पुन्हा शाळेला तसेच पत्र मिळाले. दरम्यान शाळेला येणारी पत्रं ही शाळेनेच नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या वह्यांतील पानांवर लिहलेली होती हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या वह्या तपासल्यावर त्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली.