शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रामु चव्हाण । वसमत

शहरातील कौठा मार्गावर असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांना चिखलामधुन पायपीट करत ये-जा करावी लागत आहे. या चिखलामध्ये विद्यार्थी घसरुन पडत असल्याने विद्यार्थी जखमी होण्याचे प्रकार घडत असुन याकडे संबंधीत विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने आज मंगळवारी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले.

वसमत शहरातील कौठा मार्गावर चैतन्य शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय आहे. या शाळेकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने हा रस्ता चिखलमय झाला असुन चिखलातून विद्यार्थ्यांना अर्धा कि.मी पायपीट करावी लागते. रस्तावर खड्डे असल्याने त्या खड्यात पाणी साचत असून विद्यार्थी चिखलात घसरून पडत आहेत. यामुळे विद्यार्थी जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने नगरपरिषदेला, सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार सुचना पत्रव्यवहार करूनही रस्ता करण्यास कोणीही तयार होत नाही. हिंगोली लोकसभेचे खासदार राजीव सातव यांनी सुद्धा रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. यास जवळपास ८ महिन्याचा कालावधीत उलटला. पण रस्त्याकडे खासदार सातव याना सुद्धा वेळ नसल्याचे यावरून दिसून येते.

आज मंगळवारी महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून रस्ता लवकरात लवकर करण्याची मागणी केली. तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी साबळे याना सुद्धा रस्त्यासाठी निवेदन दिले. तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग वसमत याना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना जर शिक्षणासाठी रस्ता मिळत नसेल व या रस्त्यासाठी विद्यार्थ्यांनाच रस्त्यावर उतरावे लागल्याने पालक वर्गामधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. नगर परिषद, नगरसेवक, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कधी जाग येईल असा प्रश्न नागरिकांमधुन उपस्थित केला जात आहे.