
सीएस (कंपनी सेक्रेटरी) आणि द्वितीय वर्ष लॉ अभ्यासक्रमाची परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने मुंबई विद्यापीठाने ‘लॉ’ ची परीक्षा पुढे ढकलली आहे. पण परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात परीक्षा विभागाने काढलेल्या परिपत्रकावरून विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. परिपत्रकावर विद्यापीठाने परीक्षा क्रमांकच चुकीचा टाकला असून या गलथान कारभाराविरोधात रोष व्यक्त होत आहे.
20 डिसेंबरला दुपारी 2 वाजता सीएसची परीक्षा सुरू होणार आहे. याच दिवशी लॉचा शेवटचा पेपर असून परीक्षेची वेळ दीड वाजेपर्यंत आहे. लॉचा पेपर झाल्यावर अर्ध्या तासात सीएसच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र कसे गाठायचे असा प्रश्न होता. स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. सचिन पवार यांनी लॉची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी लॉची परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात माहिती देणारे परिपत्रक काढले. सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा कधी होणार हे या परिपत्रकात स्पष्ट केलेले नाही.
5 ऑक्टोबरला जारी केलेल्या द्वितीय वर्ष लॉ अभ्यासक्रमाच्या परीक्षा वेळापत्रकात (3L00113) हा क्रमांक नमूद आहे.
20 डिसेंबर रोजी कंपनी लॉ या परीक्षेबरोबरच सीएसची परीक्षादेखील होणार आहे.
दोन्ही परीक्षांना बसणाऱया विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने लॉची परीक्षा पुढे ढकलली.
परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकांवर (3L00113) ऐवजी (3L00213) हा परीक्षा क्रमांक नमूद केल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहेत.

























































