विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या कानाखाली मारली, काशी विश्वनाथ मंदिराबाबतच्या विधानाचा वाद पेटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

काशी विश्वनाथ मंदिराबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाच्या विद्यार्थ्याने कानाखाली मारल्याची घटना लखनऊ येथे घडली आहे. या घटनेमुळे बुधवारी लखनऊ येथील प्रॉक्टर कार्यालयासमोरील एलयू कॅम्पसमध्ये एकच गोंधळ उडाला. हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. रविकांत चंदन यांना लखनऊ विद्यापीठ परिसरात कार्तिक पांडे या विद्यार्थ्याने कानाखाली मारली.

7 मे रोजी एका टीव्ही चॅनलवर ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणासंदर्भात वाद झाला होता. लखनऊ विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्राध्यापक रविकांत चंदन हेही या चर्चेत सहभागी झाले होते. हा वाद सुरु असताना रविकांत यांनी दिवंगत पट्टाभी सीतारामय्या यांच्या पंख आणि दगड या पुस्तकाचा संदर्भ देत असे म्हटले की मुघल सम्राट औरंगजेबाने वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर पाडले कारण तेथे कथित व्यभिचार झाला होता.

हाच राग मनात ठेऊन कार्तिक यांने बुधवारी प्राध्यापकांच्या कानाखाली मारली. यावेळी घटनास्थळी गर्दी जमली होती. या प्रकारची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळ गाठून कार्तिकला पोलीस स्थानकात आणले. यावेळी दोघेजण एकमेकांवर मारहाणीचे आरोप करू लागले. मात्र अद्यापही कोणीच पोलिसांकडे लेखी तक्रार दिलेली नाही.

प्राध्यापकांच्या म्हणण्यानुसार ते वर्ग घेण्यासाठी जात असताना समाजवादी छात्र सभेचे अध्यक्ष कार्तिक पांडे हे प्रॉक्टरच्या कार्यालयाबाहेर आले आणि त्यांनी शिवीगाळ सुरु केली. त्याचवेळी कार्तिक सोबत असलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर पाण्याच्या बाटलीने हल्ला केला. काशी विश्वनाथ मंदिरावरील वक्तव्यानंतर प्राध्यापक रविकांत यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाले. यानंतर 10 मे रोजी हसनगंज पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एफआयआरही नोंदवण्यात आला होता.