
मुंबई विद्यापीठांतर्गत प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रिया आज शनिवारपासून सुरू झाली आहे. मात्र प्रवेशाच्या किचकट पद्धतीमुळे दरवर्षी एफ.वाय. प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे. यंदाच्या वर्षीदेखील गोंधळाची ही परंपरा कायम राहण्याची भीती विद्यार्थी संघटना आणि कॉलेज प्राचार्यांनी व्यक्त केली आहे. एफ.वाय. प्रवेशासाठी आधी मुंबई विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी केल्यानंतर विद्यार्थी त्याला प्रवेश हव्या असलेल्या कॉलेजच्या वेबसाइटवर जाऊन त्या-त्या कॉलेजचा प्रवेश अर्ज भरू शकतो किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतो. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व नोंदणी न केल्यामुळे बारावीत चांगले गुण मिळूनही त्यांना हव्या असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला नव्हता. गुणवत्ता याद्या जाहीर होऊनही अनेक जण प्रवेशापासून वंचित राहिले.
एफ.वाय. प्रवेशासाठी ‘एक खिडकी’ योजना राबवा
एफ.वाय. प्रवेशासाठी ‘एक खिडकी योजना’ राबवा, अशी मागणी विद्यार्थी संघटना करीत आहेत. विद्यापीठाकडील प्रवेशपूर्व नोंदणी आणि संलग्नित कॉलेजांचे प्रवेश अर्ज एकाच वेबसाइटवर उपलब्ध झाल्यास ही प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी फ्रेंडली होईल. मुंबई आणि राज्याबाहेरील अनेक विद्यार्थी बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठात येतात. यातील काही विद्यार्थ्यांना एफ.वाय.च्या प्रवेशाविषयी नीट माहिती नसल्यामुळे बऱयाचदा विद्यार्थ्यांकडून प्रवेशपूर्व नोंदणी करण्याचे राहून जाते. अशी अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांत घडल्याचे विद्यार्थी संघटनांनी समोर आणले आहे.
विद्यार्थ्यांनी https://mumoa.digitaluniversity.ac/ या वेबसाइटवरून विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. n नोंदणी अर्जात विद्यार्थ्याने प्रवेश हवा असलेला अभ्यासक्रम निवडायचा आहेत. सोबतच कॉलेजची निवडही करायची आहे. n हे सोपस्कार पार केल्यानंतर विद्यार्थ्यांने या अर्जाची प्रिंट घेऊन पुन्हा कॉलेजचा ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरायचा आहे.
– ऑनलाइन प्रवेश नोंदणीशिवाय विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकणार नाही.
विद्यार्थ्यांना एफ.वाय. प्रवेशासाठी एकदा विद्यापीठाच्या वेबसाइटवर नोंदणी करून मगच कॉलेजचा प्रवेश अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाइन भरावा लागतो. ही प्रवेश प्रक्रिया सोपी झाली पाहिजे. विद्यापीठाकडून प्रवेश प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम केले जाते. मात्र तरीही काही विद्यार्थ्यांकडून प्रवेशपूर्व नोंदणी करण्याचे राहून जाते. याचा फटका म्हणजे गुणवत्ता असूनही विद्यार्थ्याला प्रवेश मिळत नाही. – डॉ. तुकाराम शिवारे, अध्यक्ष, नॉन गव्हर्न्मेंट कॉलेज प्रिन्सिपल असोसिएशन
एफ.वाय.ला प्रवेश घेण्याआधी प्रवेशपूर्व नोंदणीचा उद्देश नेमका काय, हे आधी विद्यापीठाने जाहीर करावे. ऑनलाइन हॉलतिकीट, परीक्षा राबविणाऱया विद्यापीठाने एफ.वाय. प्रवेशही ऑनलाइन पद्धतीने एकाच वेबसाइटद्वारे कसे होतील हे पहावे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेबसाइटवर देशभरातील सर्व माहिती देण्यात आली आहे. या धर्तीवर विद्यापीठानेही एफ.वाय. प्रवेशात फक्त प्रवेशपूर्व नोंदणीची जबाबदारी न घेता संपूर्ण प्रवेशाचे नियोजन करणे गरजेचे आहे. – प्रदीप सावंत, युवासेना, माजी सिनेट सदस्य





























































