शिक्षकांचा अमानूष अत्याचार; विद्यार्थ्याला इस्त्रीने दिले चटके, 2 शिक्षकांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील बेगूसराय येथे शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दोन शिक्षकांनी किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांच्या पाठीला आणि पार्श्वभागाला गरम इस्त्रीने चटके दिल्याची अमानूष घटना घडली आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

या दोन शिक्षकांनी एका 12 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत अमानूष कृत्य केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला आहे.  या घटनेमुळे विद्यार्थ्याचे नातेवाईक आणि स्थानिक लोकांनी शिक्षकांबाबत संताप व्यक्त केला आहे. बिहार येथील नीमा चांदपुरा परिसरातील चांदपुरा वॉर्ड क्रमांक 12 येथे ही घटना घडली आहे.

पीडित विद्यार्थी  येथील पीसी हायस्कूलच्या वसतीगृहात राहात होता. लॉकडाऊनमुळे हायस्कूलचे शिक्षक राहुल कुमार आणि चंदन कुमार यांच्या देखरेखीखाली तो विद्यार्थी होता. शनिवारी सायंकाळी या विद्यार्थ्याच्या छोट्या चुकीमुळे शिक्षक राहुल कुमार आणि चंदन कुमार यांना खूप राग आला. त्यामुळे त्यांनी इस्त्री गरम करून मुलाच्या पाठीला आणि पार्श्वभागाला चटका दिला आणि चटका दिल्याचे कोणाला सांगितले तर शाळेतून नाव काढून टाकण्याची धमकीही दिली.

सोमवारी विद्यार्थी घरी आल्यावर त्याने त्याच्या आईला शिक्षकांनी चटका दिल्याचे सांगितले. डाग दिलेल्या जागी जळजळ होत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर दोन्ही शिक्षकांनी केलेल्या अमानूष कृत्याबाबत संताप व्यक्त केला. तसेच त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.