सब ज्युनियर राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा, मुंबईच्या सारा व आध्यानची पदकांची लयलूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोधपूर, राजस्थान येथे नुकत्याच पार पडलेल्या जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे संकुलात शिकत असलेल्या आध्यान देसाई व सारा राऊळ यांनी धडाकेबाज कामगिरी करीत पदकांची लयलूट केली.

मुंबईच्या सारा राऊळ हिने 10 वर्षांखालील गटात प्रथम स्थान पटकाविले असून 2 सुवर्णपदक व 1 रौप्यपदक अशी एकूण 3 पदके मिळवत ती अव्वल स्थानावर राहिली. राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारी ही जिम्नॅस्ट विलेपार्ल्याच्या भाईदास धारसीभाई भुता हायस्कूलमध्ये शिकत आहे. गेली सहा वर्षे ती विलेपार्ल्यातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामध्ये जिम्नॅस्टिक्स हा क्रीडाप्रकार शिकत आहे. तसेच आध्यान देसाई याने 12 वर्षांखालील गटात प्रथम स्थान पटकावून एकूण 2 सुवर्णपदक, 1 रौप्यपदक, 1 कास्यपदक अशी एकूण 4 पदके मिळवून तो अव्वल स्थानावर राहिला. आध्यान देसाई आणि सारा राऊळ हे दोघेही प्रबोधनकार क्रीडा संकुलात नीलम बाबरदेसाई, विशाल कटकधोंड, शैलेंद्र लाड, शुभम गिरी, अचल रेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. यावेळी अध्यक्ष अरविंद प्रभू व सचिव डॉ. मोहन राणे यांचेही मोलाचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभते.