मधमाश्यांनी केले विमान हायजॅक, उड्डाणाला तासभर विलंब!

मधमाश्यांमुळे बस प्रवाशांना किंवा शेतात कामाला गेलेल्या लोकांना त्रास झाल्याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. पण यावेळी मधमाश्यांनी चक्क विमानच ’हायजॅक’ करत उड्डाणातच अडथळा निर्माण केला आहे. कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरील विस्तारा एअरलाईनच्या दोन विमानाच्या खिडक्या मधमाश्यांच्या घोळक्याने व्यापून टाकल्या. एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळी या दोन्ही दिवशी अशीच घटना घडली आहे. या मधमाश्यांना हटविण्यासाठी सुरुवातीला कर्मचाऱयांना खूप प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर अग्निशमन दलाने वॉटर जेट स्प्रेचा वापर करून मधमाश्यांना हटवले. यामुळे सायंकाळी 5.30 वाजता दिल्लीला जाणाऱया विमानाला तासभर उशीर झाला. तर दुसऱया दिवशी सकाळी 11.30 वाजता येथूनच पोर्टब्लेअरला जाणाऱया विमानाच्या बाबतीतदेखील असेच घडले. या विमानालाही उड्डाणासाठी तासभर विलंब झाला. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एअरपोर्ट ग्राऊंड आणि टर्मिनलच्या परिसरात मधमाश्यांचे पोळे आहे का याची पाहणी करण्यात आल्याची माहिती कोलकाता विमानतळाचे संचालक काैशिक भट्टाचार्य यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या