
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. यासाठी राज्यभरात जनअभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे एक याचिका दाखल करण्यात येणार असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ही मागणी देशाचे सांस्कृतिक राज्यमंत्री राम मेघवाल यांच्याकडेही करण्यात येणार आहे.
मंत्री सुभाष देसाई हे पुढच्या काही दिवसांत नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे मान्यवरांच्या सहीचे एक पत्र सुपूर्द करणार आहेत. या पत्रात 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी भाषा गौरव दिन आहे. याच दिवशी ‘अभिजात’ दर्जा देण्याच्या निर्णयाची घोषणा करावी, अशी विनंती करण्यात येणार आहे.
मान्यवरांच्या स्वाक्षरीचे पत्र
मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा या मागणीसाठी मान्यवर एकवटले आहेत. या सर्व मान्यवरांच्या स्वाक्षरीने या पत्राची परिणामकारकता आणि बळ निश्चितच वाढणार आहे. या पत्रावर ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, लेखक अच्युत गोडबोले, अभिनेता विक्रम गोखले, दिग्दर्शिका सई परांजपे, अभिनेता प्रशांत दामले, गायक सुरेश वाडकर, एअर मार्शल भूषण गोखले, चित्रकार सुभाष अवचट, शिल्पकार शरद कापूसकर, शास्त्राrय नृत्यांगना सुचेता चापेकर, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता डॉ. मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री भारती आचरेकर, क्रीडा पत्रकार सुनंदन लेले, दिग्दर्शक राजेश मापुस्कर, क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी, नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, लेखक सतीश आळेकर हे या पत्रावर स्वाक्षरी करणार आहेत.

























































