ऑक्सिजन निर्मितीसाठी उद्योगांना देणार प्रोत्साहन; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजना हाती घेतली आहे.  या योजनेंतर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱया उद्योगांना विशेष प्रोत्साहने दिली जाणार असून त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. याअंतर्गत उद्योगांना मोफत वीज, मुद्रांक शुल्क माफी, वस्तू व सेवा करात सवलत तसेच भूखंड दरात सवलत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर उद्योग विभागाने तत्काळ कार्यवाही केल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठय़ा प्रमाणात प्राणवायूची मागणी वाढली आहे. सद्यस्थितीत राज्याची प्राणवायू निर्मितीची क्षमता 1300 मेट्रिक टन/प्रतिदिन असून 1800 मेट्रिक टन एवढय़ा प्राणवायूची मागणी आहे. यापुढील काळात राज्यात 3000 मेट्रिक टन ऑक्सिजन (प्रति दिन) उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून उद्योग घटकांना प्रोत्साहने देण्याबाबत 12 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचा सविस्तर शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला.

अशी आहे तरतूद

  • गुंतवणूकदाराने प्रोत्साहनासाठीचा अर्ज 30जूनपूर्वी सादर करणे अनिवार्य
  • प्रकल्प त्वरित कार्यान्वित होण्यासाठी गुंतवणूक कालावधी फक्त दोन वर्षे
  • 100 टक्के ढोबळ राज्य वस्तू व सेवा करावर परतावा
  • मुद्रांक शुल्क माफी, विद्युत शुल्क माफी
  • विद्युत दर अनुदान रु. 2 प्रति युनिट / 5 वर्षांसाठी
  • 5 टक्के व्याज अनुदान (50 कोटीपर्यंत भांडवली गुंतवणूकपर्यंतच्या प्रकल्पांना.)
  • 25 ते 50 मेट्रिक टन प्रकल्पांना 31 डिसेंबरपूर्वी उत्पादनात गेल्यास विशेष भांडवली अनुदान.
  • भूखंडाचे वाटप प्राधान्याने व सरळ पद्धतीने
  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रामध्ये स्थापित होणाऱया घटकांना भूखंड दरामध्ये सवलत

राज्यात गुंतवणुकीस उद्योजक तयार

कोरोना-19 प्रादुर्भावाच्या तिसऱया लाटेच्या शक्यतेमुळे ऑक्सिजनची मागणी 2300 मेट्रिक टन इतकी वाढण्याची शक्यता आहे. ऑक्सिजन निर्मिती व साठा वाढविणे तसेच ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहने दिल्यामुळे राज्याची सध्याची व भविष्यातील ऑक्सिजनची गरज निश्चितपणाने पूर्ण होईल. हा निर्णय जाहीर केल्यानंतर आमच्याकडे बऱयाचशा उद्योजकांनी संपर्क साधला असून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास त्यांनी विशेष रुची दाखविली आहे, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.