
महाराष्ट्रातील न्यायालये व न्यायाधीशांच्या सुरक्षेचा तपशील सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. राज्यातील स्थानिक न्यायालये व तेथील न्यायाधीशांच्या सुरक्षेची माहिती या तपशिलात असावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. यावरील पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला होणार आहे.
धनबाद येथील एका न्यायाधीशाची हत्या झाली. याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील न्यायालये व न्यायाधीशांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आदेश प्रत्येक राज्याला दिले. त्यानुसार मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर व नागपूर खंडपीठ, कोल्हापूर सर्किट बेंच इमारत तसेच तेथील न्यायाधीशांच्या सुरक्षेचा आढावा पोलीस महासंचालकांनी घ्यावा व त्याचा तपशील न्यायालयात सादर करावा, असे आदेश खंडपीठाने दिले. राज्यातील सर्व न्यायालये व न्यायाधीशांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्याची संपूर्ण माहिती न्यायालयात सादर केली जाईल, अशी हमी महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी खंडपीठाला दिली. न्यायालयाने त्याची नोंद करून घेतली.





























































