
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ने बुधवारी रात्री ओडिशाच्या बालासोर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. कॅनिस्टराइज्ड लाँचिंग सिस्टम वापरून हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले. ही चाचणी सर्व लक्ष्यांना पूर्ण करण्यात यशस्वी ठरली आहे. ही चाचणी खास डिझाइन करण्यात आलेल्या रेल्वेआधारित मोबाइल लाँचरवरून करण्यात आल्यामुळे आता शत्रूंवर थेट धावत्या ट्रेनमधून हल्ला करता येऊ शकतो.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीची माहिती एक्सवर पोस्ट शेअर करून दिली. अग्नी प्राइम क्षेपणास्त्र 2000 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेले आणि प्रगत वैशिष्टय़ांनी सुसज्ज आहे. या चाचणीमुळे हिंदुस्थान अशा काही निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे, ज्यांच्याकडे मोबाईल रेल्वे नेटवर्कवरून क्षेपणास्त्र डागण्यासाठी कॅनिस्टराइज्ड लाँचिंग सिस्टम आहे.
काय आहे कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम?
कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम म्हणजे हे एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण तंत्र आहे. हे क्षेपणास्त्र एका मजबूत डब्यात ठेवलेले असते. डब्यात क्षेपणास्त्राचे संरक्षण होते. ते वाहून नेणे आणि प्रक्षेपणासाठी तयार ठेवणे सोपे होते. कॅनिस्टर ट्रक, रेल्वे किंवा मोबाईल लाँचरवर ठेवून क्षेपणास्त्र वाहून नेले जाऊ शकते.