हल्लीची गाणी फास्ट फूडसारखी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश दराडे

पूर्वीच्या काळी गाणे रेकॉर्डिंगपूर्वी बैठक व्हायची. त्यात गायक, संगीतकार, अभिनेते सगळे सहभागी व्हायचे आणि गाण्याबद्दल चर्चा करायचे. त्यामुळे त्या गाण्यात खऱया अर्थाने जान यायची. आता परिस्थिती बदलली असून टेक्नॉलॉजीमुळे हल्लीची गाणी ही फास्ट फूडसारखी झाली आहेत. काही काळ आपल्याला ती आकर्षित करतात. पण ती फार प्रेक्षकांच्या लक्षात राहत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ गायक सुदेश भोसले यांनी व्यक्त केली.

तुमच्या इतक्या मोठय़ा संगीत प्रवासात एखादी राहून गेलेली गोष्ट कोणती?
– माझी आई सुमन भोसले आणि आजी दुर्गाबाई भोसले. या क्लासिकल गायिका होत्या. मलाही क्लासिकल शिकण्याची खूप इच्छा होती, पण ती इच्छा अपूर्ण राहिली. तरीही मी वेगवेगळ्या आवाजात गाऊ शकतो, बोलू शकतो ही मला मिळालेली दैवी देणगीच आहे. त्यामुळे खंत करण्यासारखे काहीच नाही.

हल्ली लहान मुले संगीत रियालिटी शोमध्ये झळकतात. हे शो मुलांच्या प्रगतीसाठी किती फायदेशीर आहेत?
– रियालिटी शोमुळे देशाच्या कानाकोपऱयातील टॅलेंट जगासमोर येत आहे. ही चांगली बाब आहे, पण अल्पावधीत मिळालेल्या प्रसिद्धीमुळे डोक्यात हवा जाते. याला पालक जास्त जबाबदार असतात कारण आपल्या मुलांना ते तसे ट्रीट करतात. शो संपल्यावर पुढे पाच-सहा महिन्यात जेव्हा आजूबाजूची गर्दी कमी होऊ लागते, शो मिळत नाहीत तेव्हा ही मुले डिप्रेशनमध्ये जातात. म्हणूनच शोमुळे मिळालेले यश बाजूला ठेवून पुन्हा गाण्याचा रियाज सुरू ठेवायला हवा. स्ट्रगल करून मिळालेले यश हे जास्त टिकते यावर माझा विश्वास आहे.

गायक म्हणून एखादे गाणे स्वीकारताना तुमचे काय निकष असतात? गाण्यापूर्वी कशी तयारी करता?
– सर्वात आधी मी गाण्याची चाल, शब्द, क्रीनवर कोणता अभिनेता कोणत्या परिस्थितीत ते गाताना दाखवणार आहे याचा अभ्यास करून गाण्याचा मूड समजून घेतो. त्यानुसार मी तो अभिनेता कसे हावभाव करेल, एखादा शब्द कसा उच्चारेल याची तयारी करून गाणे सादर करतो. कोणतेही गाणे आले की मी ते माझे पहिलेच गाणे आहे असे समजून गातो. संगीत दिग्दर्शक नवीन असो किंवा जुना त्याकडे मी विद्यार्थी म्हणून जातो आणि जोपर्यंत तो समाधानी होत नाही तोपर्यंत गाण्याची माझी तयारी असते.

हल्लीची गाणी प्रेक्षकांच्या लक्षात राहत नाहीत असे का?
– आधी गाण्यांच्या सीटिंग व्हायच्या. त्यात कलाकारांपासून, संगीतकार, गायक सहभागी व्हायचे. गाण्याबद्दल चर्चा व्हायची, पण आता तसे होत नाही. टेक्नॉलॉजीमुळे गाण्यातला आत्माच हरवला आहे. त्यामुळे हल्लीची पूर्वीसारखी प्रेक्षकांच्या लक्षात राहत नाही.

नव्याने येणाऱया कलाकारांना काय संदेश द्याल?
– कलाकार कोणताही असो त्याने आपल्या कलेचा आदर करायला शिकले पाहिजे. कारण ही दैवी देणगी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यशाने डोक्यात हवा जाऊ देऊ नका आणि अपयशाने खचू नका. प्रयत्न करत रहा.

‘उलटे’ सिनेमातील तुमच्या गाण्याबद्दल काय सांगाल?
– हेमांगीनी पटडीया आणि जित कुमार निर्मित आणि मनोज नाथवानी दिग्दर्शित ‘उलटे’ या सिनेमासाठी मी दोन गाणी गायली आहेत. ‘बाप्पा आये है…बाप्पा छाये है’ असे या एका गाण्याचे बोल आहेत. बाप्पाचे हे गाणे तुफान गाजेल असा मला विश्वास आहे. माझा मित्र बिपिन चुनावाला याने या गाण्यांना संगीत दिले आहे.