मुलांच्या जीवावर पालकांची कमाई, चाईल्ड एन्फ्ल्युएन्सर्सना चाप लावण्याची सुधा मूर्ती यांची मागणी

इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यात लहान मुलांचा थेट कण्टेंट म्हणून वापर केला जातो. लहान मुलांच्या निरागसतेचा, त्यांच्या गोंडस दिसण्याचा वापर करून सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि त्यातून पैसा मिळविण्याचा प्रकार काही जणांकडून होताना दिसतो. या ट्रेंडबद्दल आता थेट राज्यसभेत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. खासदार सुधा मूर्ती यांनी राज्यसभेत हा प्रश्न उपस्थित करत लहान मुलांचा डिजिटल माध्यमावरील वापर नियंत्रित करण्यासाठी नियमावली तयार करण्याची मागणी केली.

सुधा मूर्ती म्हणाल्या, अनेक पालक त्यांच्या निरागस मुलांचा वापर सोशल मीडियासाठी करतात. या मुलांना ते काय करत आहेत, याची जाणीवही नसते. मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख, ड्रेस, लिप्सिंग करून व्हिडीओ तयार केले जातात. या व्हिडीओतून ह्यूज आणि फॉलोअर्स मिळतील. त्यातून पैसाही मिळेल, असा पालकांचा प्रयत्न असतो. आर्थिक मदत होत असली तरी हा प्रकार चांगला नाही, असेही सुधा मूर्ती म्हणाल्या. जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रात मुलांच्या सहभागावर नियंत्रण ठेवणाऱया केंद्र सरकारच्या उपायांचे कौतुक करत जाहिराती, चित्रपटांतील बालकलाकार यांसाठी कडक नियम आहेतच, पण इंटरनेट प्लॅटफॉर्मवर अशा नियंत्रणाची गरज आहे असे सुधा मूर्ती यांनी स्पष्ट केले.