सुधाकर परिचारक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. परिचारक यांनी पंचवीस वर्षे या भागाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांचा कारभार काचेसारखा स्वच्छ व पारदर्शी असतो, असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. यावेळी खोत यांनी विरोधी उमेदवार भारत भालके यांच्यावर टीका केली. खासदार नाईक निंबाळकर म्हणाले, विरोधी उमेदवाराने किती पक्ष बदलले आहेत याची गणतीच नाही. ज्या पक्षात ते जातात तो पक्षच संपतो, आता राष्ट्रवादीही संपणार असल्याचा दावा त्यांनी केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना विजयसिंह मोहिते पाटील यांनी, सुधाकर परिचारक हे तीस ते चाळीस हजार मतांनी विजयी होतील असा विश्‍वास व्यक्त केला. जिल्ह्यात अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. मागील पंचवीस वर्षे आपण अनेकांचे प्रश्‍न सोडविले आहेत. आता पाच वर्षात जास्तीत जास्त प्रश्‍न सोडविणार असल्याचे आश्‍वासन परिचारक यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहित पाटील, माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, शिवसेना जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, साईनाथ अभंगराव, सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, मंगळवेढा अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, चरणुकाका पाटील, आरपीआयचे शहराध्यक्ष संतोष पवार व शिवसेना, भाजपा, रिपाइं, रयत क्रांती, रासपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

भालके व आवताडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल
पंढरपूरात भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर मंगळवेढ्याचे उद्योजक समाधान आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केले आहेत.भालके यांनी गुरूवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र राष्ट्रवादीचा एबी फॉर्म जोडून अर्ज त्यांनी स्वतः दाखल केला. समाधान आवताडे यांनी यंदा अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. कोणत्या ही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.