
>> सुधाकर वसईकर
आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू यादरम्यानचा प्रवास! जन्म म्हणजे प्रस्थान तर मृत्यू गंतव्य स्थान. आयुष्यप्रवासातील हे दोन अटळ टप्पे आहेत. यादरम्यानच्या विविध टप्प्यांवर माणसाला भलेबुरे, अनेकविध अनुभव येतात. लेखक दिलीप पाटील यांनी आपल्या आयुष्यातील अनुभवांकडे तटस्थपणे पाहून, ते सर्जनशीलतने ‘साद प्रतिसाद’ या पहिल्यावहिल्या पुस्तकात मांडताना जणू आयुष्याचे सारच सांगितले आहे.
पहिल्या भागात गणरायाला वंदन करून काव्ययात्रेची मंगल सुरुवात केली असून, उत्स्फूर्तपणे रचलेली गणरायाची आरती मन प्रसन्न करणारी आहे. शेवटच्या प्रकरणात, श्रद्धेच्या देव्हाऱयातील विठू माऊली, खंडोबा यांचे स्मरण आहे. तसेच भगवद्गीतेचे सार स्वरचित ‘जीवनमार्गाची ओवी’तून मांडून, आध्यात्मिक जगणं स्पष्ट केलं आहे.
‘खरंतर साहित्य हे केवळ रंजन नसून, ते मनावर संस्कार करून मलीन विचार स्वच्छ करते. जगण्याला आधार देणारी सत्यम् शिवम् सुंदरम् ही मूल्ये साहित्यिकांनी अंगीकारून साहित्यनिर्मिती केली तर या मूल्यांचे जतन होईल. त्यासाठी साहित्यिकांनी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत.’ असे आरंभाच्या पुस्तकातच पाटील यांनी पोटतिडकीने मांडून, ते किती खोल जाणिवेने साहित्याकडे पाहतात याची प्रचीती ‘सत्यम् शिवम् सुंदरम् या दुसऱया भागातच देतात. खरंतर सत्यम शिवम सुंदरम ही त्रिसूत्रीच प्रस्तुत संग्रहाची मध्यवर्ती संकल्पना असून, आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील चितारलेले सकारात्मक अनुभव वाचकाला समृद्ध करणारे आहेत.
त्यातीलच एक लेख म्हणजे ‘आयुष्याचा प्रवास’! पाटील म्हणतात, स्वप्नं दाखवणारी, गोंजारणारी, आनंद देणारी, अर्धवट नात्याची, तर ओझं बनून राहणारी माणसंही भेटतात. पण ही माणसं ओळखता आली पाहिजेत. त्यातूनच माणूस घडतो. हे त्यांनी ‘जगण्याच्या वाटचालीतील संचित’ या कवितेच्या पुढील ओळीतून छान सांगितलंय.
वाटतं माणसाने, माणसासाठी जगत राहावं सुखाने आयुष्याच्या वाटेवर भेटतात अनेक माणसं प्रेमाने आयुष्याच्या प्रवासात माणसं भेटतात आणि आपुलकी, विश्वास, प्रेमाने स्नेहबंधाचा आपसूक साकव बांधला जातो. हा साकव अहंकार, गैरसमज आणि अबोला यामुळे मोडायचा की जोडायचा आणि मोडला तरी कसा जोडायचा हे सर्वस्वी माणसाच्या मनावर आहे. कधी मैत्रीने, कधी नात्याने तर कधी आठवणीच्या अदृश्य धाग्यांनी तो बांधला गेलेला असतो. कारण माणूस हे एकल अस्तित्व नाही. हे तत्त्व ‘स्नेहबंध’भागात छान विषद केलं आहे.
आयुष्याचा जितका सहज स्वीकार करतो त्याचप्रमाणे मृत्यूचाही करता आला पाहिजे. याचं विलक्षण चिंतन ‘मृत्यू-एक अटळ सत्य’ या लेखात आहे. साधारणत कोणत्याही व्यक्तीच्या मेंदूचे, हृदयाचे काम थांबले किंवा मेंदू व हृदय बंद पडले तर मृत्यू होतो. ही विज्ञानातील मृत्यूची वेगळी व स्पष्ट व्याख्या करून, जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य पाटील यांनी अधोरेखित केले आहे. मृत्यूबाबतच्या अध्यात्मिक आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातील फरक नेमकेपणाने स्पष्ट करून, भयमुक्त जगण्यासाठी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनच महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले आहे.
पाटील यांनी सूक्ष्म निरीक्षणातून टिपलेला निसर्ग, त्यातील प्रत्येक घटक आणि त्याच्या छोटय़ा छोटय़ा हालचालीतून मांडलेले जीवनविषयक विचार स्तिमित करतात. पाऊस, निसर्गरम्य कोकण, नातीगोती, गावाकडची जिव्हाळ्याची माणसं, त्यांच्यातला स्नेहभाव, याचं समग्रतेने केलेलं जिवंत चित्रण, केवळ 140 पृष्ठसंख्या असलेल्या आटोपशीर 45 लेखांतून रेखाटण्याची किमया पाटील यांनी पहिल्याच पुस्तकात साध्य केलीय. कारण त्यांचं वाचन अफाट आहे. प्रत्येक लेखातून एक स्वतंत्र विचार मुक्तपणे मांडला आहे. स्वतचं तत्त्वज्ञान मांडलं आहे. कोणत्याही अनुभवाचे चिंतन-मनन प्रचंड सकारात्मक आहे. आपले अनुभवविश्व संवेदनशीलतेने, संयतपणे, तरलतेने, स्थीर चित्तवृत्तीने साकारतात. त्यामुळे वाचकाच्या मनावर ते ठसा उमटवतात. लेखातील भावनांचे सखोल चित्रण, भाषेची लय, ताल, तसेच चपखल शब्दांची दिलेली जोड भाषासौंदर्य वाढविणारे असल्याने, ललित लेख आणि त्यावरील आशयघन, अर्थपूर्ण काव्य वाचकाला भावते.
उच्च निर्मिती मूल्य असलेले हे पुस्तक अष्टगंध प्रकाशनाने प्रकाशित केले असून, गणेश विसपुते यांनी आशयानुरूप मुखपृष्ठ सुंदर रेखाटलं आहे. कवी, प्रा. अशोक बागवे यांनी सुंदर शब्दांत केलेली शुभेच्छापर पाठराखण आणि डॉ. महेश केळुसकर यांची प्रभावी प्रस्तावना ‘साद प्रतिसाद’ ला लाभली आहे.
साद प्रतिसाद
लेखक : दिलीप पाटील
प्रकाशन : अष्टगंध प्रकाशन
पृष्ठे : 143 ह मूल्य : रु. 250/-






















































