
संधीवात म्हणजेच अर्थरायटिस. या आजारात सांधे दुखणे, सांध्यांना सूज येणे अशा प्रकारचे त्रास होतात. त्यामुळे चालणे, जमिनीवर बसणे-उठणेही कठीण होऊन बसते. वाढत्या वयाबरोबर शरीरातील संधीवाताची लक्षणेही वाढू शकतात. याकरिता नियमित व्यायाम आणि समतोल आहार याकडे वेळीच लक्ष दिल्यास या आजारातून लवकर बरे व्हायला मदत होऊ शकते. ज्यांना संधीवाताचा त्रास आहे, अशा रुग्णांनी आहारात या फळांचा समावेश केल्यास सांधेदुखीवर आराम मिळू शकतो.
संत्र आणि आंबट फळे
सर्वच आंबट फळे आणि संत्र यामध्ये जीवनसत्त्व सी जास्त प्रमाणात असते. जीवनसत्त्व सी संधीवात असलेल्या रुग्णांकरिता फायदेशीर आहे. या फळांमध्ये असलेल्या अँण्टीऑक्सीडंट या घटकामुळे गुडघे आणि हाताच्या साध्यांना सूज येणे किंवा दुखणे कमी व्हायला मदत होते. यासाठी संधीवात असलेल्या रुग्णांनी आहारात लिंबू, संत्र तसेच ऋतुमानानुसार मिळणाऱ्या आंबट फळांचा समावेश करावा.
टरबूज
टरबूजमध्ये लायकोपीन हा घटक असतो. या फळातील अँण्टीइफ्लेमेटरी, कॅरोटेनॉइड बीट-क्रिप्टोजैन्थिन या गुणधर्मांमुळे
संधीवात आणि संधीवाताची शरीरावरील लक्षणे बरी होतात. संधीवाताचे रूमेटाईड अर्थराइटिस हे लक्षण जाणवत असल्याचे टरबूज खाणे फायदेशीर असल्याचा तज्ज्ञ देतात.
अॅवोकाडो
या फळात जीवनसत्त्व सी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे संधीवाताच्या रुग्णांकरिता हे फळ गुणकारी मानले जाते. यातील मायक्रोन्यूट्रिएंट गुणधर्मामुळे संधीवातामुळे शरीराला आलेली सूज कमी होते. संधीवाताची लक्षणे शरीरात जाणवू नयेत याकरिताही फळ काही वेळा खाल्ले जाते. सुरुवातीच्या टप्प्याला असलेले संधीवाताचे दुखणेही आहारात या फळाचा समावेश केल्यास कमी होते. अॅवोकाडोला सुपरफ्रुटही म्हणतात.
चेरी
संधीवातावर आराम मिळण्याकरिता चेरी फळ खावे. चेरीच्या ज्यूसचाही आहारात समावेश करू शकता. यामुळे हळूहळू सांध्याचे दुखणे कमी होऊ लागते. कारण यामध्ये अँण्टीइंफ्लेमेट्री गुण असतात. चेरीमध्ये एंथोसायनिन अँण्टीऑक्सीडेंट गुणधर्म असतात यामुळे सांध्यांना आलेली सूज कमी व्हायला मदत होते.
द्राक्ष
संधीवाताच्या रुग्णांना द्राक्ष खाण्याचा सल्ला दिला जातो. द्राक्षामध्ये अँण्टीऑक्सीडंटस् आणि अँण्टी इम्फ्लामेटरी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. यामुळे सांध्यांना आलेली सूज आणि दुखणे दूर होते तसेच द्राक्षाच्या सालीमध्ये रेस्वेट्रॉल नावाचे अँण्टीऑक्सिडंट असते, यामुळे सांधे दुखत असल्यास द्राक्ष खावीत.

























































