यंदा २४ साखर कारखाने ऊस गाळपास सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवानंद गरड । संभाजीनगर

साखर सहसंचालक प्रादेशिक कार्यालय, संभाजीनगरअंतर्गत येत असलेल्या २४ साखर कारखान्यांनी यंदा ऊस गळीत हंगाम घेण्याचा निर्णय घेऊन ऊस गाळपाची परवानगी देण्याची मागणी साखर आयुक्त, पुणे यांच्याकडे केली आहे. या प्रस्तावामध्ये शासकीय देणी बाकी असलेल्यांमध्ये विभागातील चार साखर कारखान्यांचाही समावेश आहे.

संभाजीनगर विभागाअंतर्गत येत असलेल्या २४ साखर कारखान्यांनी गतवर्षी ऊस गळीत हंगामामध्ये सहभाग घेतला होता. सरासरी ८५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. यंदा विभागात उसाचे क्षेत्र वाढले असले तरीही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका उसाच्या उत्पादनाला बसला आहे. गतवर्षी सरासरी ७ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. त्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र ६ हजार हेक्टरने वाढले आहे. मात्र उसाचे अपेक्षित उत्पादन हाती येण्याची शक्यता कमीच आहे. कारण यंदा पाऊसकाळ समाधानकारक झाला नाही. त्याचा फटका उसाच्या फडाला बसला आहे. उत्पादन घटले आहे. संभाजीनगर विभागात सरासरी ८० ते ९० मेट्रिक टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज बांधून प्रशासनाने यंदाच गळीत हंगामाचे नियोजन केले आहे.

संभाजीनगर विभागातील ऊस गळीत हंगामाच्या कामाचा आढावा प्रभारी साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी नुकताच संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयात घेतला. यावेळी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, ऊस उत्पादकांचे प्रतिनिधी आणि कार्यालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. संभाजीनगर विभागातून यंदा २४ साखर कारखान्यांनी ऊस गाळपाची परवानगी मागितली आहे. साखर कारखान्यांनी दिलेल्या या सर्व प्रस्तावांची प्रादेशिक कार्यालयात छाननी होऊन ऊस गाळप परवान्यासाठी साखर आयुक्त, पुणे यांच्याकडे पाठविले आहेत. या प्रस्तावांमध्ये विभागातील चार साखर कारखाने शासकीय देणी, थकबाकीदार असतानाही त्यांचे प्रस्ताव पुढे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांचा समावेश आहे.

यांनी मागितली गाळपाची परवानगी
साखर सहसंचालक, प्रादेशिक विभाग, संभाजीनगरअंतर्गत खासगी आणि सहकारी तत्त्वावर चालणाNया २४ साखर कारखान्यांनी ऊस गाळप करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील ‘माजलगाव’, ‘जय भवानी’, ‘येडेश्वरी’, ‘लोकनेते’, ‘वैद्यनाथ’ आणि ‘एनएसएल-जय महेश’ साखर कारखान्यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील ‘समर्थ’, ‘सागर’, ‘श्रद्धा एनर्जी’, ‘रामेश्वर’ तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील ‘मुक्तेश्वर शुगर’, ‘बारामती-अ‍ॅग्रो’, ‘छत्रपती संभाजीराजे’, ‘शरद’, ‘संत एकनाथ’ आणि घृष्णेश्वर साखर कारखाना शिवाय नंदुरबार-जळगाव जिल्ह्यातील अनुक्रमे ‘आदिवासी’, ‘सातपुडा तापी’ ‘संत मुक्ताई शुगर’, मधुकर’तसेच अन्य दोन कारखान्यांचा समावेश आहे.