जालन्यातील शेतकऱ्याची जिद्द, नवे तंत्रज्ञान अवगत करत 3 एकरात 2 दिवसात ऊस लागवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मजुरांची टंचाई तसेच वाढलेले मजुरीचे दर व पारंपरिक पद्धतीला फाटा देत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गहिनीनाथनगर येथील शेतकऱ्याने अत्याधुनिक पध्दतीने ऊस लागवड केली. ऊस लागवडीसाठी वेळ आणि पैशाची बचत करून नवे तंत्र अवगत केले. या शेतकऱ्याने 3 एकर क्षेत्रावर अवघ्या दोन दिवसात ऊस लागवड केली आहे.

सध्या मजुरांची खुप टंचाई कुठल्याही कामाला मजूर मिळत नाही. मिळणाऱ्या मजुरांची मजुरी शेतकऱ्यांना परवडत नाही. आजच्या परिस्थितीत महिलेला 150 ते 200 रुपये रोजंदारी द्यावे लागते. तर पुरुष मजुरांना 250 ते 300 मजुरी देऊनही वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल होत आहे. पिक लागवड करणे किंवा काढणे सर्व कामाला मजूर लागतात. त्यामुळे पिक लागवड व पिक काढणी वेळेत होत नाही.

त्यात ऊस लागवड करायची असल्यास मोठया प्रमाणात मजूर लागतात. वाढत्या मजुरीमुळे ऊस लागवड शेतकऱ्यांना परवडत नाही. या सगळ्या खर्चावर गहिनाथनगर येथील शेतकरी उद्धव मुरलीधर मिसाळ व शारदा उद्धव मिसाळ या दाम्पत्याने मात करत घरच्या घरी ट्रॅक्टरवर 3 एकर क्षेत्रावर ऊस लागवड केली आहे.

शेतकरी उद्धव मिसाळ यांच्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर असून या ट्रॅक्टरने प्रथम मोकळ्या रानात 4 फुटांवर सरी पाडले. नंतर त्या सरीयंत्रावर सरी यंत्राच्या दोन्ही लेझरवर तीनच्या पाईपचे 5 फुटाचे तुकडे बसत त्या पाईपव्दारे 4 फुटावर पाडलेल्या पुन्हा त्याच सरीत ट्रॅकरने ऊस लागवड केली. यामुळे ऊस खांडुन सरीवर टिपरे अंथरण्यासाठी तसेच ऊस दाबण्यासाठी सर्व कामावर लागणाऱ्या मजुरांची बचत झाली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवड करावी

शेतकरी उद्धव मिसाळ यांनी सांगितले की, प्रथम पूर्ण ऊसाचे तुकडे करून नंतर सरीयंत्रावर पाईप बसवून पाईपव्दारे ऊसाचे तुकडे टाकून फक्त 2 दिवसात लागवड केली. हेच मजुराव्दारे केले असते तर आठवडा लागला असता आणि खर्चही जास्त लागला असता. 3 एकर ऊस लागवड मी, माझी पत्नी आणि दोन मुले तसेच बाहेरील एक मजुर हाताखाली घेऊन 1 हजाराच्या डिझेल खर्चामध्ये केल्याचे उद्धव मिसाळ यांनी सांगितले. पारंपरिक पद्धत बदलून, मजुराच्या खर्चावर मात करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवड करावे असे आवाहन त्यांनी केले.