
बापू सुळे । मुंबई
गोडाचे खाणार त्याला देव देणार म्हणत साखरेबरोबरच गोडधोड पदार्थांवर आडवा हात मारणार्यांनी गेल्या तीन-चार वर्षांत डायबेटीसच्या भीतीने साखरेचं खाणं कमी केलं आहे. त्यामुळे साखर बाजारात सध्या साखरेलाच डायबेटीस झाल्याचे चित्र आहे. 2014-15 मध्ये वर्षाला प्रत्येक माणूस सरासरी 20.5 किलो साखर खात होता. मात्र ते प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले असून आता साडेअठरा किलोपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढूनही साखरेच्या विक्रीचे प्रमाण स्थिर आहे.
देशात वर्षाला सुमारे 325 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होत आहे. त्यापैकी जवळपास 250 लाख मेट्रिक टन साखर देशातच वापरली जाते. मात्र सध्या डायबेटीसमुळे अनेक अजारांना अमंत्रण मिळत असल्याने नागरिकांनी साखरेचे खाणे कमी केले आहे. तसेच शुगर फ्री पदार्थ खाण्याकडे कल वाढला आहे. याचा फटका थेट साखरेच्या विक्रीला बसला असल्याचे नॅशनल शुगर फेडरेशनने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. 2013-14 मध्ये प्रतिमाणशी साखर खाण्याचे प्रमाण 20 किलो होते. त्यामध्ये 2014-15 मध्ये वाढ होऊन साडेवीस किलो एवढे झाल्याने देशातील साखरेचा वापर 256 लाख मेट्रिक टनावर पोहचला होता. मात्र त्यानंतर साखरेबरोबरच साखरेचे पदार्थ खाण्याला उतरती कळा लागली आहे. त्यानुसार 2015-16 मध्ये साखर खाण्याचे प्रमाण एक किलोने कमी होऊन साडेएकोणीस किलोपर्यंत खाली आले आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत 2017-18 मध्ये अर्ध्या किलोची घट होऊन जवळपास साडेअठरा किलोपर्यंत खाली घसरले आहे. देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाही देशातील साखर विक्रीचे प्रमाण स्थिर आहे.
गुळाची चव वाढली
साखर खाण्याच्या प्रमाणात घट होत असली तरी गूळ आणि खांडसरी साखरेची चव दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. 2014-15 मध्ये वर्षाला प्रतिमाणशी गूळ आणि गुळाचे पदार्थ खाण्याचे प्रमाण सव्वातीन किलो एवढे होते. त्यामध्ये गेल्या तीन वर्षांत वाढ होऊन साडेचार किलो एवढे झाले आहे.
वर्ष प्रतिवर्षी साखर खाण्याचे प्रमाण किलोमध्ये
2012-13 18.9
2013-14 20.1
2014-15 20.5
2015-16 19.6
2016-17 18.9
2017-18 18.5

























































