साखरेची विक्री घटली, गोदामांमध्ये दोन वर्षांचा साठा पडून

670

थेट्रा-थेट्रात ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक हाऊसफुल्ल होत असले तरी महाराष्ट्रातील प्रत्येक ‘हाऊस’मधील साखरेचे प्रमाण मात्र घटले आहे. डायबेटीस अर्थात मधुमेहाचे लचांड मागे लागू नये म्हणून आता जिभेवर साखर ठेवण्याचीही राज्याला भीती वाटत असून सिगारेटच्या पाकिटावर जसा वैधानिक इशारा असतो तसाच इशारा आता साखरेच्या पोत्यांवर छापला जाणार आहे… साखरेचे सेवन हे आरोग्याला अपायकारक आहे!

नॅशनल फेडरेशन ऑफ शुगर फॅक्टरीज लिमिटेड (एनएफएसएफएल) या संस्थेच्या आकडेवारीनुसार साखरेचे सेवन सरासरी प्रति व्यक्ती प्रति वर्षी दोन किलोने कमी झाले आहे. 2014-15मध्ये प्रत्येक व्यक्ती दरवर्षाला सरासरी 20.5 किलो साखरेचे सेवन करीत होती, पण 2017-18 या वर्षात साखरेच्या सेवनाचे प्रमाण घटले आणि प्रति व्यक्ती दरवर्षाला साखरेच्या सेवनाचे प्रमाण 18.5 किलोवर आले. 2017-18 या आर्थिक वर्षात साखरेचे उत्पादन 32 दशलक्ष टन होते आणि साखरेच्या सेवनाचे प्रमाण 25 दशलक्ष टन होते.

डायबेटीसमुळे साखर सेवन घटले

मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येच नव्हे, तर गावागावातही जीवनशैली बदलली आहे. रोजची धावपळ, व्यायामाचा अभाव, बैठे काम आणि खाद्यसंस्कृतीतील ‘फास्ट’ बदल यामुळे लहानपणीच मधुमेहाची लागण झालेले धक्कादायक आरोग्य वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे नेहमी गोड बोला, पण त्यासाठी साखरच खायला हवी असे नाही, असा सल्ला डॉक्टर देतात.

महाराष्ट्रातील जनतेने भीतीपोटी म्हणा किंवा डॉक्टरी सल्ला मानल्यामुळे म्हणा, पण साखरेचे प्रमाण कमी केल्याची आकडेवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. त्यांच्या मते प्रति व्यक्ती प्रति दिन 100 ग्रॅम साखरेचे सेवन कमी झाले आहे. विशेष म्हणजे, सेवन कमी झाले, परिणामी विक्री कमी झाली. त्यामुळे राज्यातील गोदामांमध्ये दोन वर्षांचा साखर साठा पडून आहे, असेही आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.

चॉकलेट उत्पादकांनी साखरेचा उपयोग कमी

चॉकलेट आता गोड राहिले नसल्याची गोड बातमीही गायकवाड यांनी दिली. काही प्रख्यात कंपन्यांनी त्यांच्या चॉकलेटमधील साखरेचा वापर 23 टक्क्यांनी कमी केला आहे. त्याशिवाय औषधांमधील साखरेचे प्रमाणही कमी करण्याची योजना आहे.

ज्याप्रमाणे एखाद्या खाद्यपदार्थांच्या पाकिटावर त्यात किती पोषक तत्त्वे आहेत याचा उल्लेख बंधनकारक आहे. तसेच खाद्यपदार्थात साखरेचे प्रमाण किती याचा तपशील छापणे बंधनकारक केले जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या