गुरुदत्त’ उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार, अध्यक्षांचा विश्वास

561

महापुराने यंदा उसाचे मोठे नुकसान झाले आहे. साखर कारखानदारीही आर्थिक संकटात आहे. तरीही सर्व संकटावर मात करीत पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करीत उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम राखणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले. टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील गुरूदत्त शुगर्सच्या 16 व्या गळित हंगाम प्रारंभप्रंसगी ते बोलत होते.

घाटगे म्हणाले, “की शेतकर्‍याला केंद्रबिंदू ठेवून कारखान्याची वाटचाल सुरू आहे. थेट बांधापर्यंत अनेक ऊसविकास योजना कारखान्याने राबिवल्या आहेत. चोख व्यवस्थापनामुळे कारखान्याचे उपक्रम देशपातळीवर चमकले आहेत. कारखान्याने गेल्या हंगामात अंतिम टप्प्यात ऊसपुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांना पाच रुपये दराने एकरी 120 किलो साखर व त्यांच्या कुटुंबियांसाठी तीस हजार रुपयांचा मेडिक्लेम कारखान्याने उतरवला. यावेळीही ही योजना सुरु राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकर्‍यांनी आपला ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन  घाटगे यांनी केले.

माधवराव घाटगे यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून, कुरुंदवाडचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या हस्ते काटापूजन करून हंगामास प्रारंभ झाला. यावेळी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक- निंबाळकर यांच्यासह विविध गावचे सरपंच, सदस्य, व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

यंदाचा गुरुदत्त कारखान्याचा दर 3067 रुपये
गुरुदत्त शुगर्सने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना नेहमीच उच्चांकी दर दिला आहे. गेली तीन वर्षे सलग तीन हजार रुपयांच्यावर शेतकर्‍यांना ऊसदर देऊन शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक समृध्दी निर्माण केली आहे. सन 2016 -17 मध्ये 3148 रूपये, सन 2017 -18 मध्ये 3054, सन 2018-19 मध्ये 3064 रूपये इतका उच्चांकी दर दिला आहे.तर 2019 – 20 च्या चालु गळीत हंगामात 3067 रूपये इतका दर शेतकर्‍यांना मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या