पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्याची शक्यता, राज्यात दोन लाख हेक्टर उसाचे क्षेत्र घटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात साधारणपणे 15 दिवसांपासून पाऊस पडत आहे. मात्र, पडणारा पाऊस हा मुंबई, उपनगरे, कोकणपट्टा आणि विदर्भ, मराठवाडय़ातील काही ठरावीक भागात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता ऊस साखर कारखानदारी असणाऱया नगर, नाशिक, पुणे या जिह्यांसह सोलापूर जिह्यातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. हा पट्टा साखर कारखानदारीशी निगडित आहे. या भागात दमदार पावसाची प्रतीक्षा असून, या भागात पाऊस नसल्याने ऊस पिकावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. यामुळे यंदा राज्यात साखरचे उत्पादन दोन लाख हेक्टरने घटणार असल्याचे चित्र आहे. अगोदरच अडचणीत सापडलेली साखर कारखानदारी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राज्यात ठरावीक पट्टय़ात पडणारा पाऊस आणि यंदा साखर गाळप हंगाम तसेच होणाऱया साखर उत्पादनाबाबत राष्ट्रीय साखर संघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राज्यातील साखर उत्पादनावर चिंता व्यक्त केली आहे. यंदा राष्ट्रीय साखर संघाने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील साखर उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

यामुळे राष्ट्रीय साखर संघाने यंदा महाराष्ट्रात गतवर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र 13 लाख हेक्टरवरून 11 लाख हेक्टरपर्यंत खाली आणले आहे. यंदा राज्यात 2 लाख हेक्टरने उसाचे क्षेत्र कमी होणार असल्याने त्याचा परिणाम ऊस उत्पादन आणि पर्यायाने साखर गाळपावर होणार आहे. देशात मात्र उत्तर प्रदेश राज्यात साखर उत्पादन वाढणार असून, देशात हे राज्य साखर उत्पादनात अव्वल राहणार असल्याचा अंदाज राष्ट्रीय साखर संघाने व्यक्त केला आहे. देशात कर्नाटक आणि तामीळनाडू राज्यात सध्या विशेष गाळप हंगाम सुरू असून, महाराष्ट्रात विद्यमान हंगामात 330 लाख मेट्रिक साखर उत्पादन होणार असून, या पुढील वर्षी मात्र ते 310 लाख मेट्रिक टनापर्यंत मर्यादित राहण्याचा अंदाज राष्ट्रीय साखर संघाचा आहे.

सध्या असणारी लागवड पुढीलप्रमाणे

नगर 101 हेक्टर, पारनेर 64 हेक्टर, श्रीगोंदा 5 हजार 332 हेक्टर, कर्जत 1 हजार 285 हेक्टर, जामखेड 296 हेक्टर, पाथर्डी 551 हेक्टर, संगमनेर 164 हेक्टर, कोपरगाव 259 हेक्टर यांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यात नव्याने ऊस लागवड सुरू झाली नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे.

12 हजार हेक्टरवर नवीन लागवड

जिल्ह्यात चालू वर्षी नव्याने 11 हजार 911 हेक्टरवर नव्याने उसाची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. या लागवडची टक्केवारी 12.58 टक्के असून, पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक तालुक्यात लागवडी रखडल्या आहेत. साधारण थंडीच्या आधी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात अनेक तालुक्यांत नवीन ऊस लागवडीचे प्रमाण वाढणार असल्याचे सांगण्यात आले.