
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आणि त्यामुळे ऊसतोड कामगारांची होणारी फरफट हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. अडचणीत सापडलेल्या ऊसतोड कामगारांच्या मदतीला सरकार धावून आले आहे. सरकारने सर्व ऊसतोड मजुरांची त्यांच्या घराकडे जाण्याची व्यवस्था केली आहे.
बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात येथे ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी जातात. यंदा कारखान्याचे हंगाम संपण्याच्या वेळेतच कोरोनामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर झाली. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो ऊसतोड मजूर अडकून पडले होते. या ऊसतोड कामगारांना घरी पोहचवण्याची मागणीही जोर धरत होती. ही मागणी लक्षात घेऊन सरकारने मागणी मान्य करून ऊसतोड मजुरांना आपल्या गावापर्यंत पोहचवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुक्याच्या सीमेवर ऊसतोड मजुरांचा ओघ वाढला आहे. जिल्हामध्ये प्रवेश देताना प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट नाका सुरू केला् आहे. तालुक्यातील अनपटवाडी, साकत रोड, सौताडा, पांढरवाडी या ठिकाणी महसूल, आरोग्य, शिक्षण, पंचायत समिती विभागाचे पथक कार्यरत आहे. प्रत्येक चेकपोस्ट नाका सकाळी व रात्री सुरूच राहणार आहेत. या चार चेकपोस्ट नाक्यावर शंभरच्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत.





























































