
>> सुजाता बाबर
खगोलशास्त्र हा मानवी कुतूहलाचा प्राचीन, परंतु सतत विस्तारत राहणारा प्रवास आहे. आकाशातील तारे, ग्रह, धूमकेतू, दीर्घिका, कृष्णविवरे यांचे रहस्य उलगडण्यापासून ते अंतराळातील नवनवीन मोहिमा आणि शोधांपर्यंत ही सफर आपल्याला नेहमीच नव्या क्षितिजांकडे घेऊन जाते. या सदरामध्ये आपण खगोलशास्त्रातील ताज्या घडामोडी, संशोधन आणि आकाशातील अद्भुत रहस्यांचा वेध घेणार आहोत.
मानवाने जेव्हा पहिल्यांदा अंतराळात पाऊल ठेवले तेव्हा असा प्रश्न उपस्थित झाला की ‘अंतराळात माणूस राहू शकतो का?’ पण लवकरच हा प्रश्न पुढे गेला तो म्हणजे ‘माणूस अंतराळात किती काळ राहू शकतो?’ आणि शेवटी एक गंभीर प्रश्न समोर आला की ‘अंतराळातच जगण्यासाठी आवश्यक अन्न-धान्य आपण पिकवू शकतो का?’ आज या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या दिशेने नासासह जगभरातील अनेक अंतराळ संस्था सातत्याने प्रयोग करत आहेत.
अंतराळ शेतीची सुरुवात
1960 च्या दशकात सोव्हिएत संघाच्या ‘बायोन’ मालिकेतील उपग्रहांवर अंतराळात प्रथमच सूक्ष्मजीव, बिया आणि झाडांच्या पेशी नेऊन त्यांच्यावर प्रयोग करण्यात आले. 1971 मध्ये सॅल्यूट-1 या अंतराळ स्थानकावर अंतराळवीरांनी मुळ्याच्या आणि कांद्याच्या बिया उगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 1982 मध्ये सोव्हिएत संघाने मोहरीच्या जातीच्या अरॅबिडॉप्सिस या झाडाचे पूर्ण जीवनचक्र बीपासून बीपर्यंत अंतराळात पूर्ण करून दाखवले. अमेरिकेतही अशाच प्रयोगांचा प्रवास झाला. 1973 मधील स्कायलॅब मोहिमेत वनस्पतींची वाढ, प्रकाशप्रतिक्रिया आणि गुरुत्वाकर्षणाच्या अनुपस्थितीत होणारे बदल यावर संशोधन झाले.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील शेती प्रयोग
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कार्यान्वित झाल्यानंतर 2000 पासून वनस्पती प्रयोगांना नवा वेग मिळाला. लाडा हरितगृह या रशियन प्रणालीत गहू, वाटाणे, मोहरीची रोपे यशस्वीरीत्या पिकवली. ‘लाडा’ हे नाव वसंत ऋतूच्या प्राचीन रशियन देवीच्या नावावरून देण्यात आले आहे. ही वनस्पती वाढीची एक प्रणाली आहे. 2014 मध्ये नासाच्या व्हेगी प्रणालीचा शुभारंभ झाला. हे यंत्र म्हणजे एक लहानशा बॅगेएवढय़ा आकाराचे ‘अंतराळ हरितगृह.’
2015 मध्ये व्हेग-01 मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमच वाढवलेली ‘रेड रोमन लेटय़ूस’ ही पाने प्रत्यक्ष खाल्ली. ही घटना अंतराळशेतीच्या इतिहासातील मोठा टप्पा ठरली. यानंतर व्हेग-02 मध्ये झिनिया ही रंगीबेरंगी फुले अंतराळात यशस्वीरीत्या उमलली. फुलांच्या वाढीमुळे अंतराळवीरांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला हे विशेष लक्षात आले.
व्हेग-03 – नवी दिशा
आता व्हेग-03 मोहिमेने अंतराळशेती आणखी पुढच्या टप्प्यात नेली आहे. क्रू-11 मोहिमेतील अंतराळवीरांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्यावर ‘सीड पिलो’ वापरून नवीन प्रयोग सुरू केले. ही पिलो म्हणजे मऊ कपडय़ांमध्ये बंदिस्त केलेल्या बिया होय! यामध्ये विशेष चिकणमाती व खत मिश्रित वाढीचे माध्यम असते. यामुळे पाणी आणि हवा मुळांभोवती समप्रमाणात पोहोचते. या प्रयोगात अंतराळवीरांना स्वतच्या पसंतीने पिके निवडण्याची संधी मिळते. वसाबी मस्टर्ड ग्रीन्स, रेड रशियन केल आणि ड्रगन लेटय़ूस यांची लागवड आता सुरू केली आहे. एलीडी प्रकाश आणि फुगवता येणाऱया पारदर्शक घुमटांमुळे योग्य वातावरण निर्माण होते. अंतराळवीर या पिकांना पाणी घालतात, छायाचित्रे काढतात आणि वाढ नोंदवतात. पिकलेले काही अंश तत्काळ खाल्ले जातात तर उर्वरित नमुने पृथ्वीवर पाठवले जातात.
अंतराळातील या प्रयोगांमुळे पृथ्वीवरही नवे मार्ग खुलत आहेत. घरातील शेतीमध्ये कमी जागेत, नियंत्रित प्रकाश आणि पोषणमूल्यांच्या सहाय्याने मोठय़ा प्रमाणात पिके घेण्याच्या तंत्राला प्रोत्साहन मिळत आहे. गुरुत्वशून्यतेत पाणी पोहोचवण्याचे तंत्र पृथ्वीवरील पाण्याची कमतरता भासत असलेल्या भागांसाठी उपयुक्त ठरू शकते. हिरवाईचा सहवास वृद्ध, अपंग किंवा मानसिक ताण अनुभवणाऱया लोकांसाठी उपचारात्मक ठरू शकतो. नासाच्या निरीक्षणांवरून या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.
चंद्र-मंगळ मोहिमांसाठीची तयारी दीर्घकाळ चालणाऱया मोहिमांमध्ये अन्नपदार्थ पृथ्वीवरून पाठवणे खूप खर्चिक असते आणि त्यामुळे ‘स्थानकावरच अन्न उत्पादन’ ही संकल्पना अपरिहार्य आहे. चंद्रावर वा मंगळावर राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी ही ताजी पिके जीवनरक्षक ठरतील. अंतराळ शेती म्हणजे केवळ वैज्ञानिक प्रयोग नव्हे तर मानवाच्या भविष्यातील अस्तित्वाचा प्रश्न आहे. हिरवी पाने, रंगीबेरंगी फुले किंवा धान्य हे फक्त अन्नपुरवठा करणारे घटक नाहीत तर ते मानसिक उभारी देणारे मित्रही आहेत. आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर लावलेली बिजे उद्याच्या चंद्र-मंगळ मोहिमांची पायाभरणी करत आहेत आणि कदाचित उद्या पृथ्वीवरच्या शेतीतही नवे क्रांतिकारी उपाय जन्माला घालतील. अंतराळातील ही लहानशी हिरवाई मानवाच्या अन्नसुरक्षेचे आणि भविष्यकालीन अंतराळ प्रवासाचे बीज ठरणार आहे, यात शंका नाही.
[email protected]
(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)





























































