मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षनेत्यांच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

‘माझे वडील,आई काय विचार करत असेल हे माहिती नाही मात्र मी वडिलांच्या विरोधात जाऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे’ असं सांगत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मंगळवारचा दिवस गाजला तो भाजपने केलेल्या राजकीय फोडाफोडीमुळे. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण-विखे-पाटील यांच्या मुलालाच भाजपने आपल्याकडे वळविले आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांनी सुजय विखे-पाटील यांचे नाव खासदारकीसाठी पाठवणार असल्याचे सांगितले. सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी द्यायची की नाही हे संसदीय समिती ठरवेल, मात्र इथून पाठवलेले नाव सहसा बदलले जात नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सुजय विखे-पाटील यांच्या प्रवेशाच्या वेळी बोलत असताना हिंदुस्थानने सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केला. त्यांच्या उल्लेखानंतर राजकीय वर्तुळात मुख्यमंत्र्यांनी थेट विरोध पक्षनेत्यांच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याची चर्चा रंगली होती. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले की ‘सुजय विखे-पाटील यांच्या घरच्यांनाही काही काळानंतर कळेल की त्यांचा हा निर्णय योग्य होता.’

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने नगर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला देणार नसल्याचे जाहीर केले होते. सुजय विखे-पाटील हे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड धडपड करत होते. काँग्रेसला हा मतदारसंघ सुटणार नसल्याने त्यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी येणाऱ्या काळात असे आणखी भूकंप होतील असे विधान केलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज नेत्यांना आपल्या गळाला लावू शकते.

निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची सुजय विखे यांची कबुली

मंगळवारी सकाळपासून दक्षिण मुंबईतील गरवारे क्लबमध्ये राजकीय गडबड सुरू झाली होती. सुजय विखे-पाटील आणि त्यांच्या पत्नी मुंबईमध्ये सकाळीच दाखल झाले होते. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते-पाटील हे देखील गरवारे क्लब परिसरात दिसून आले होते. मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच सगळ्यांचे लक्ष सुजय विखे-पाटील यांच्या प्रवेशाकडे लागले होते, त्यादरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील कुठे गेले हे मात्र कळू शकले नाही.

सुजय यांच्यासाठी नगरचा मतदारसंघ काँगेसने मागून घ्यावा या मागणीसाठी राधाकृष्ण विखे- पाटील यांनी काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. मात्र सुजयच्या उमेदवारीचा आग्रह सोडून द्या अशा शब्दांत राहुल यांनी सुनावले. इतकेच नाही तर तुमच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडायची का, असा सवाल राहुल यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर विखे-पाटील यांनी काँगेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह काँगेस नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली, मात्र या भेटीतही सोनियांनी थेट आश्वासन देण्याचे टाळले.त्यामुळे नगर मतदारसंघ काँग्रेसला मिळणं आणि काँग्रेसकडून सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी मिळणं अशक्य असल्याचं वडील आणि मुलगा दोघांना कळून चुकले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान सुजय यांचे नाव खासदारकीसाठी सुचविले जाणार असल्याचे म्हटले. दिलीप गांधी यांचे यावेळी तिकीट कापले जाणार हे त्यांच्या या विधानानंतर जवळपास निश्चित झाले आहे. दिलीप गांधी नगरमधून दोनदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.  या प्रक्रियेत दिलीप गांधी यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणाहून सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी भाजपने नक्की केल्याचे सांगण्यात येते. सोमवारी गांधी समर्थकांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात निवड मंडळाची बैठक चालू असताना जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे देखील मुख्यमंत्री नाराज झाले असून त्यांची नाराजी गांधी यांना भोवण्याची चिन्हे आहेत.