
सामना प्रतिनिधी । नगर
वडील काँग्रेसमध्ये म्हणून मी काँग्रेसमध्ये राहीलेच पाहिजे असे नाही, असे स्पष्ट मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे यांनी व्यक्त केले आहे. तसेच माझे वडील काँग्रेसचे नेते असले, तरी मला माझा पक्ष निवडण्याचा अधिकार आहे. मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल, तर मी त्या नेतूत्वाकडे जाईल. त्यास माझ्या कुटुंबाचा विरोध असला, तरीही मी माझा निर्णय घेईल, असेही विखेंनी नमूद केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे पत्रकारांशी बोलताना होते.
विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सलोख्याचे सबंध असल्याने विखे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा नेहमीच सुरू असतात. त्यात विखेंचे पुत्र डॉक्टर सुजय यांना नगर लोकसभेची जागा लढवायची आहे. त्यांनी वेळोवेळी काँग्रेस पक्षाने तिकीट देवो अथवा नाही, मी निवडणूक लढवणारच असल्याचे म्हटले आहे.
विखे यांच्या या ताज्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या अगोदरसुद्धा सुजय विखे यांनी निवडणुक लढणार असा निर्धार व्यक्त करुन कोणात्या पक्षाकडून लढणार यापेक्षा निवडणूक लढणारच असे जाहीर केले होते. दोन वर्षापासून नगर दक्षिणचा दौरा मोठ्या प्रमाणावर त्यांनी पूर्ण केलेल आहे. विविध कार्यक्रमांची त्यांनी केला आहे. आता काँग्रेस राष्ट्रवादी अंतर्गत जागा वाटपाचा वाद हा टोकाला गेला आहे. तिन वेळेला बैठका होवून देखील सुद्धा नगरची जागा अद्यापही कोणाकडे जाणार याची चर्चा अंतिम टप्प्यात झालेली नाही.
त्यातच आज सुजय विखे यांनी आपण अन्य पक्षात सुद्धा जाऊ शकतो असा सूचक इशाराच दिल्याने पुन्हा विखे व भाजपच्या जवळीकची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यातून सुजय विखे हे कोणत्या पक्षात जाणार की काँग्रेसमध्येच राहणार आणि निवडणूक लढणार हा देखील प्रश्न नगर जिल्ह्यात सर्वांनाच पडला आहे. यांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर आता सुजय विखेंच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत.






















































