
सामना प्रतिनिधी । बीड
बीडच्या सुमीत वाघमारे हत्या प्रकरणी पोलिसांनी हवे असलेले बालाजी लांडगे आणि संकेत वाघ हे दोन संशयित आरोपी अमरावती जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. हे दोन्ही आरोपी रेल्वेने प्रवास करत आहेत अशी माहिती मिळताच बीडच्या पोलिसांनी नागपूर आणि अमरावती रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. अमरावती रेल्वे पोलिसांनी बडनेर रेल्वे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बडनेर येथेच रेल्वे स्टेशनवर प्रवास करत असताना या दोघांना जेरबंद केले आणि बीड पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांना जेरबंद करण्यामध्ये अजून काहीसा वेळ लागला असता तर कदाचित दोन्ही संशयित आरोपी पकडण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागली असती.
असा केला संशयित आरोपींनी प्रवास
बुधवारी 19 डिसेंबर रोजी सुमीत वाघमारे याची हत्या झाल्यानंतर वापरलेली गाडी बीडमध्ये सोडून बालाजी लांडगे आणि संकेत वाघ दुचाकीवर नगरमार्गे पुण्याला गेले. पुण्याहून कल्याण, कल्याणहून पुढचा प्रवास त्यांनी सुरू केला. त्यांनी थेट हैद्राबाद गाठले. तेथून नागपूरला आले आणि नागपूरहून विशाखापट्ट्णमकडे जात असताना बडनेर जि.अमरावती या रेल्वेस्थानकावर त्यांना जेरबंद केले. बीड सोडल्यापासून तब्बल सव्वाशे तास हे दोन्हीही संशयित आरोपी प्रवासात होते. दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या सिमकार्ड बदलले. त्यामुळे पोलिसांना त्यांचे लोकेशन माहीत होत नव्हते.






























































