
सामना ऑनलाईन, बीड
घरच्यांच्या इच्छेविरोधात तरूणासोबत लग्न केल्याचा राग आल्याने त्याचा भररस्त्यात निर्घृणपणे खून करणाऱ्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना पाच दिवसांनंतर पोलिसांनी अमरावती येथून अटक केली आहे. बीडच्या गांधीनगर परिसरामध्ये 19 डिसेंबरला बहिणीच्या नवऱ्याची भावाने मित्रांच्या मदतीने धारधार शस्त्राने वार करू हत्या केली होती. गेल्या बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. मयत सुमित वाघमारे (25 रा.तालखेड ता. माजलगाव ह.मु. नागोबा गल्ली, बीड) हा आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होता. परीक्षा देऊन घरी परतत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. कॉलेजपासून जवळच करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये सुमीत जागीत गतप्राण झाला होता
घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह
सुमीत आणि भाग्यश्री हे दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनीही आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला. भाग्यश्रीच्या घरच्यांचा प्रेमसंबंधाला विरोध असल्याने तिने आणि सुमितने दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. लग्नामुळे भाग्यश्रीच्या घरात जबरदस्त नाराजी निर्माण झाली होती. लग्नानंतर भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे आणि सुमितचा जबरदस्त वाद झाला होता. या भांडणानंतर रागाच्या भरात बालाजीने बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्याच्यावर हल्ला करत खून केला होता.






























































