उन्हाळी वेळापत्रकात देशांतर्गत उड्डाणांना ब्रेक; 12% घट, इंडिगोच्या विस्तारावर लगाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात रविवारी लागू झालेल्या नव्या उन्हाळी उड्डाण वेळापत्रकात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 12 टक्क्यांनी देशांतर्गत उड्डाणांची संख्या कमी करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी IndiGo या देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीच्या विस्तार योजनांबाबत सावध भूमिका घेतल्याने ही घट झाली आहे.

इंडिगोने दर आठवड्याला एक नवीन विमान ताफ्यात सामील होणार असल्याचे गृहीत धरून उड्डाणांचे नियोजन सादर केले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी कंपनीला प्रत्यक्ष विमानांची उपलब्धता, वैमानिकांची संख्या आणि आवश्यक क्षमता सिद्ध केल्यानंतरच अतिरिक्त उड्डाणांसाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले. “गेल्या डिसेंबरमधील गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी अधिक काळजी घेतली,” असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

यंदा जवळपास सर्व विमान कंपन्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत कमी उड्डाणांचे वेळापत्रक सादर केले आहे. “इंडिगोने पुन्हा अति विस्तार करू नये, अशी आमची भूमिका होती. कंपनीने क्षमता दाखवल्यानंतरच उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवली जाईल,” असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गेल्या उन्हाळ्यात नागरी उड्डाण मंत्रालयाने आठवड्याला 25,610 देशांतर्गत उड्डाणांना मंजुरी दिली होती, जे 2024 च्या तुलनेत 5.5% अधिक होते (24,275). मात्र, यंदा ही संख्या सुमारे 3,000 ने कमी होऊन जवळपास 12% घट अपेक्षित आहे. इंडिगोने मागील उन्हाळ्यात 14,158 साप्ताहिक उड्डाणांचे वेळापत्रक सादर केले होते.

दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या दृष्टीने मोठा मुद्दा हा मंजूर वेळापत्रक नसून वाढते ऑपरेटिंग खर्च आहेत. एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किमतीतील वाढ आणि रुपयाचे घसरणारे मूल्य यामुळे तिकीट दरांवर थेट परिणाम होणार आहे. तिकीट दर खूप वाढल्यास प्रवासी मागणी कमी होऊ शकते, ज्यामुळे उड्डाणांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत विमान कंपन्यांसाठी या वाढत्या खर्चात सेवा चालवणे अधिक कठीण ठरणार आहे. एप्रिल महिन्यासाठी ATF दरांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्याचा परिणाम संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रावर होण्याची चिन्हे आहेत.