उन्हाळी मेवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
preserved-food-items

>> डॉ. शरयू देशपांडे

उन्हाळ्याच्या आगमनाची चाहूल लागली की, वेध लागतात ते वाळवणं आणि बेगमी पदार्थांचा घाट घालण्याचे! तसंही उन्हाळ्याला आमचं हैदराबाद जरा अधिकच प्रिय! त्यामुळे इतरांपेक्षा अंमळ लवकरच हजेरी लावतो इथे आणि अगदी निवांत मुक्काम ठोकून शाही, नवाबी थाटात राहून जुलैमध्ये नाइलाजानं निरोप घेतो.

फेब्रुवारीपासूनच बाल्कनीत उन्हं रेंगाळायला लागतात, तेव्हा अप्रूप वाटतं. मार्चमधे कौतुक, एप्रिलमधे राग आणि मेमध्ये चिडचिड! पार भट्टी होऊन मंडळी लेकराबाळांनां घेऊन माहेरी जातात. पण मग यावेळी मुक्काम वाढवलेल्या थंडीला निरोप देताना आलेल्या उन्हाळ्यामुळे सुरुवातीला असे काहीतरी शिळोप्याचे उद्योग सुचायला लागतात.

वास्तविक, वाळवणांसाठी मस्तपैकी प्रशस्त अंगण, टुमदार गच्ची किंवा निदान टेरेस तरी हवं छानसं! पण `नही मामू से नकटा मामू अच्छा है’ म्हणत मी आपली बाल्कनीत येणाऱ्या सकाळच्या `मामुलगा’ (तुटपुंज्या) उन्हावर काम भागवते. अर्थातत वाळवणं वगैरे करण्यापर्यंत अजून खरं तर मी मजल मारलेली नाही. अतिशय चिकाटीचं आणि निगूतीचं काम आहे ते! `तेथे पाहिजे जातीचे’.. मात्र सोपे आणि फार `कुटाणा’ (मराठवाडी शब्दकोश) नसलेले प्रकार करून पहायला मला आवडतात अधूनमधून…

वाळकं /शेंदाड: मद्रासी काकडीचे हे दोन सोपे प्रकार. मराठवाड्यात आणि हैदराबादी मराठी खाद्यसंस्कृती /cuisine मध्ये अगदी हमखास आढळतात. मधल्या वेळात कुडुमकुडूम तोंडात टाकायला अथवा जेवणात तोंडी लावणं म्हणून वापरले जाणारे. आज एकदा नमनाचे घातले. पुन्हा महिन्याभराने सूर्यबाप्पा छान तापायला लागला की अजून एक सेशन करता येईल. आज मी घातलेले जिन्नस छान कडक व्हायला मला दोन दिवस जास्त लागतील.

१. वाळक्याचे सांडगे /वडे : एक मध्यम आकाराचं वाळकं घेऊन साल काढून किसून घेतलं. बिया आणि गरासहीत. त्यात अंदाजे तिखट, मीठ, हळद आणि किंचित हिंग मिसळून या मिश्रणात दोन तीन भांडी मुरमुरे मिसळले. हाताने छान मुठबंद होईल इतपत एकजीव केलं. अर्धा तास झाकून ठेवलं. नंतर असे गोल चपटे वडे केले. दोन तीन दिवस उन्हात छान वाळवून कडक झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवले. हे वडे खाताना हलके तळून घ्यायचे.

२. उसऱ्या : यादेखील वाळकाच्याच. काहीशा आंबोशीसारख्या. सालासहित पण बिया आणि गर काढून घेऊन असे छोटे काप करायचे. हलक्या हाताने मीठ लावून दोन तीन दिवस वाळवायला ठेवायचे. नंतर हवाबंद डब्यात ठेवायचे. तिखटमीठ लावून ते नुसतेही खाता येतात अथवा थोडेसे वाफवून तिखटमीठ फोडणी दिल्यास झटपट भाजीसारखे ही कामी येतात. मूळ भाजीची चव आणि वर वाळवणाचा लागलेला स्वाद यामुळे एकदम मस्त लागते ही भाजी.

३. चटणी : या सोबत एक जोडपदार्थ byproduct ही तयार होतो. बिया आणि गर दाणेकुटासोबत तिखटमीठ घालून मिक्सरमधून फिरवून घेऊन वर कडीपत्ता, हिरवी मिरची, हिंग हळद यांची फोडणी द्यायची. इडली चटणीसारखी छान आंबटगोड लागते चवीला. दोसा धिरडी यासोबतही घेता येते.
(टीप : यासाठी वाळकं/शेंदाड /मद्रासी काकडी छान मध्यम किंवा पूर्ण पिकलेलं घ्यावं म्हणजे त्याची मस्त आंबटगोड चव सर्वात उतरते.)

खास मराठवाड्यात केला जाणारा वाळवणाचा आणखी एक खास प्रकार म्हणजे खारोड्या अर्थात खारवड्या. तुम्ही काहीही म्हणा, पण काही काही शब्दांचे उच्चार त्यांच्या अपभ्रंशित रूपातच अधिक साजरे वाटतात. लहान मुलाचे बोबडे बोल जसे अधिक मधुर आणि आपलेसे वाटतात तसेच! मूळ उच्चार माहिती असूनही पुष्कळ वेळा बोलण्याच्या ओघात अपभ्रंशितच शब्द वापरला जातो, कारण लहानपणापासून तोच ऐकण्यात आलेला असतो. त्यामुळे तोच अधिक जवळचा वाटतो. `खारोड्या’ हादेखील असाच एक अपभ्रंशित शब्द. खारवड्या हा मूळ, पण म्हणताना आणि ऐकताना कानाला `खारोड्या’च सोपा आणि गोड वाटतो. पदार्थ केवळ चवीमुळेच नव्हे तर त्याचं नाव आणि पर्यायाने निगडीत आठवणींमुळे अधिक जवळचा वाटतो… या खारोड्यांनां कुणी `बाजरीचे सांडगे’ म्हटलं की खूप वाईट वाटतं. कुणीतरी आपल्यापासून आपल्या बालपणीच्या, कॉलेज जीवनातल्या, सुट्ट्यातला आनंद हिरावून घेतंय असा भास होतो. जो आपलेपणा `खारोड्या’मध्ये आहे तो `बाजरीचे सांडगे’ म्हणण्यात नाही बुवा!..

प्रत्येक पदार्थ आपल्यासोबत रेसिपीबरोबरच सुरम्य आठवणींची शाल पांघरून येतो. काही पदार्थ तर त्यांच्या चवीपेक्षाही सोबत लपेटून येणाऱ्या आठवणींसाठीच आवडतात. अर्थात चवीला डाव्या नाहीतच! या खारोड्या कुठे पण तरीही कुठलीही चव आवडीत रूपांतरीत होण्यासाठी एक तर सवय तरी व्हावी लागते नाहीतर भोवती आठवणींचं कोंडाळं तरी असावं लागतं. `खारोड्या’ या नुसत्या शब्दाने माझ्यासमोर प्रथम हे असं चार जिन्नसांनीं भरलेलं ताट, दोन तीन जिवाभावाच्या मैत्रिणी (किंवा जिवाभावाचे पुलं, वपु, जीए, दांडेकर यापैकी कुणीतरी), ऊतू जाणाऱ्या गप्पा, पानगळ जमलेली गच्ची आणि मग अख्खा उन्हाळाच समोर उभा राहातो! कधी गावाकडून आलेल्या, कधी आजोळहून आलेल्या, कधी घरी घातलेल्या, या खारोड्या (मिठाचा खार थोडा अधिक असल्याने या खारोड्या) कल्हई केलेल्या पितळी बगुन्यात बाजरी भरडा, मीठ, थोडं जिरं, तीळ घालून शिजवून ते बगुनं सुती कापडाच्या मदतीनं हातात धरून आणलं जायचं.. मग आम्ही हाताने मेणकापडावर छोटे छोटे डोंगर उभारायचो … (यात लसूण, तिखट वगैरे घालतात पण मला साध्या आवडतात. फक्त किंचित जास्त मीठ घालून मूळ बाजरीचा स्वादच छान वाटतो)

या वड्या तळून खातात. खरं तर आम्ही त्या कच्च्याच खायचो.. गच्चीवरच मुक्काम असायचा…नाहीतर अंगणात. वड्या पुरत्या वाळेपर्यंतही दम निघायचा नाही.. अर्धी वाळवणं अंगणातच संपायची.. `अगं नका गं खाऊ पोरींनो, पोटं दुखतील ‘.. हे ऐकून न ऐकल्यासारखं करायचो… (लहानपणी कसली आलीये भीती आजारी पडण्याची .. उलट मजाच वाटायची..) सोबत शेंगदाणे, गूळ, बुक्कीने फोडलेला कांदा.. घरचा पेरू, कैरी असाही बराच मेवा असे… आणि हा सगळा जामानिमा सांभाळत लाकडी बांबूच्या शिडीवरून गच्चीवर चढायचं…(मागाहून लोखंडी जिना बांधला) चार पाचच्या सुमारास उन्हं असायचीच गच्चीवर, पण जांभळीच्या सावलीत मधूनच येणाऱ्या गार झुळूका सुखावून जात…..

वड्या बाजरीच्या असल्याने अतिशय उष्ण पण म्हणूनच सोबत उष्णता मारक म्हणून कांदा खायचो. खारोड्या स्वबळावर निवडणूक लढवू शकत असल्या तरी त्या तब्येतीसाठी फारशा बऱ्या नाहीत. शेंगदाणे, कांदा या इतर पक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढल्यास अपेक्षेपेक्षा पटीने जास्त यश पदरी पडतं.. किंचित मिठाळ चव सोबत कच्चे शेंगदाणे, कांदा, हे यशस्वी कलाकार छान संपादून घेतात…

एकूणच या छोट्या छोट्या गोष्टींनीं किती समृद्ध उन्हाळा असायचा.. कुठल्याही gadgets अथवा इतर करमणुकीच्या साधनांशिवायही वेळ अगदी आनंदात जात असे! किती कमी व्याप होते.. साधं एकेरी जगणं… ओंजळभर.. पण तृप्त असायचं..

हे असं होतं.. जुने पदार्थ म्हटले की, रेसिपीपेक्षा आठवणीच प्रकर्षाने, अगदी ३D, ५D होत, आजूबाजूला गराडा घालतात… तब्येती साथ देईनाशा झाल्या, तसतशी घरातल्या बायकांनी उन्हाळी कामं कमी केली..काही वाळवणं घरी आणि काही आजूबाजूच्या, ओळखीच्या, एखाद्या गरजू `मावशी’ किंवा `काकू’कडून घ्यायला सुरुवात केली (आई म्हणायची, `स्वार्थ ही होतो आणि परमार्थही’)

वाळवणाच्या बाबतीत मी असा परमार्थ पुष्कळ करते! पुण्यात एक दोन ठिकाणी खारोड्या विचारल्यावर बाजरीचे छोटे छोटे सांडगे पुढे आले…त्या इलुशा सांडग्यात माझी गच्ची, आठवणी, उन्हाळा कसा सामावणार??.. पण मग जेव्हा माहेराहून, टपोऱ्या `खारोड्या’चं पार्सल आलं तेव्हा गार गार वाटलं.. जांभूळलेल्या आठवणींसारखं…