उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी करा ‘या’ मसाल्याच्या पदार्थाचा वापर, 4 समस्या होतील दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्यात आहारविहाराबरोबरच त्वचेची काळजी घेणेही अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या दिवसांत तीव्र ऊन, धूळ, प्रदूषण, अंगाला येणारा घाम यामुळे मृत त्वचेचा थर शरीरावर साचतो. त्यामुळे स्वच्छतेबाबत जागरुक राहिले नाही, तर त्वचेवरील छिद्रे बंद होतात आणि त्वचेवर मुरुमं, पुटकुळ्या, पिग्मेंटेशन असे त्रास होऊ शकतात. त्वचेच्या यासारख्या समस्यांपासून सुटका होण्यासाठी आणि त्वचेच्या सौंदर्यात वाढ होण्यासाठी उन्हाळ्यात चेहऱ्याकरिता हळदीचा समावेश करावा. हळदीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवरील डाग, पुटकुळ्या दूर होऊन त्वचा चमकदार होते. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचा वापर केला, तर दिवसभर तुमची त्वचा चमकदार आणि उजळ राहायला मदत होते. जाणून घेऊया हळदीचे त्वचेवरील उपाय.

मुरुमांपासून बचाव
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचा लेप चेहऱ्यावर लावून तो वाळल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. यामुळे मुरुमं नष्ट व्हायला मदत होते. हळदीमध्ये अँण्टीबॅक्टेरियल, अँण्टीऑक्सिडंट आणि अँण्टीफंगल हे गुण असतात. यामुळे ज्यांना चेहऱ्यावर मुरुमं येण्याचा त्रास असतो. त्यांनी हळदीचा वापर करावा.

चेहरा उजळ होतो
उन्हाळ्यात चेहरा काळवंडतो. काळवंडलेला चेहरा उजळावा यासाठी हळदीचा वापर करणे आवश्यक आहे. हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो. काळपटपणा दूर होतो. डार्कनेस कमी व्हायला मदत होते. हळद, गुलाब पाणी आणि बेसन पिठाची पेस्ट तयार करून त्वचेवर लावावी. यामुळे ग्लो वाढायला मदत होते.

मृत त्वचेकरिता
गर्मीच्या दिवसांत चेहऱ्यावर धूळ साचते. ही साचलेली धूळ आणि मृत त्वचा निघून जाण्याकरिता हळद फायदेशीर ठरते. हळद पावडरमध्ये दूध घालून फेस पॅक तयार करा. त्यानंतर चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा स्वच्छ व्हायला मदत होईल.

सुरकुत्यांवर उपाय
चेहऱ्यावरील सुरकुत्या, फाइन लाइन्समुळे त्रस्त झाला असाल तर हळदीचा वापर करा. याकरिता रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला हळदीचा लेप लावून झोपा. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि फाइन लाइन्स दूर व्हायला मदत होईल. शिवाय रंगही उजळेल.