तेजोमय कंकण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विनिता नवलकर

वर्षाच्या शेवटी अवकाशाच्या रंगमंच्यावर कंकणाकृती सूर्यग्रहणाची भव्य कलाकृती दक्षिण हिंदुस्थानातून पाहायला मिळणार आहे.

नाताळनंतरचा दिवस म्हणजेच 26 डिसेंबर हा जगभर ‘बॉक्सिंग डे’ म्हणून साजरा होतो. प्रथेप्रमाणे आपल्या जवळच्या लोकांना भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा केला जातो. खगोलप्रेमींनासुद्धा या वर्षी ‘बॉक्सिंग डे’ला एक अनोखी भेट मिळणार आहे. एक तेजोमय कंकण! म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी.

येत्या 26 डिसेंबरला दक्षिण हिंदुस्थानातून साधारण कोइम्बतूर, उटी, मँगलोर या पट्टय़ातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. सकाळी 7ः59 ला ग्रहणाचा पहिला स्पर्श होईल. त्यानंतर साधारण 10 : 47 ला कंकणाकृती सूर्य पाहायला मिळेल. 3 मिनिट 40 सेकंद आपल्याला या दृश्याचा आनंद घेता येईल. या काळात सूर्य सोन्याच्या बांगडीसारखा दिसू लागेल! यालाच ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात. 2010 नंतर- म्हणजेच 9 वर्षांनी आपल्याला असं सुंदर कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर दुपारी 1 : 35 ला ग्रहण संपेल.

अमावस्येला पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येतो. त्यामुळेच अमावस्येलाच खग्रास किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतं. अमा म्हणजे एकत्र आणि वसती म्हणजे राहणे. ज्या दिवशी सूर्य-चंद्र एकत्र असतात तो दिवस अमावस्येचा. या दिवशी चंद्र सूर्याबरोबरच उगवतो आणि मावळतो. पण सूर्याच्या प्रखर प्रकाशात तो आपल्याला दिसत नाही. मात्र प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येत नाहीत. पृथ्वीची सूर्याभोवतीची फिरण्याची कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा यामध्ये सवापाच अंशांचा कोन आहे. त्यामुळे काही अमावस्याना चंद्र पृथ्वी-सूर्य प्रतलाच्या वर किंवा खाली असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी काही सूर्यग्रहण होत नाही.

सूर्यग्रहणाच्या निरीक्षणाचा इतिहास फार जुना आहे. हिंदुस्थान व इतर संकृतींमध्ये फार पूर्वीपासून सूर्यग्रहणाच्या नोंदी आढळतात. हिंदुस्थानी दंतकथेत चंद्र-सूर्याला राहू-केतू नावाचे राक्षस ‘ग्रहण’ करतात, अशी नोंद आढळते. वैज्ञानिकदृष्टय़ा पहिले तर राहू आणि केतू हे अवकाशात असे दोन बिंदू आहेत ज्याच्या जवळ सूर्य-चंद्र आल्यास ग्रहणाची शक्यता वाढते. सवापाच अंशांनी कललेली चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेला ज्या दोन बिंदूंमध्ये छेदते तेच हे दोन बिंदू म्हणजे राहू आणि केतू. म्हणूनच कदाचित सातत्यपूर्ण निरीक्षणानंतर आपल्या पूर्वाज्यांनी अशी कथा मांडली असेल.

सूर्यग्रहणांचे विविध प्रकार पाहायला मिळतात. खंडग्रास, खग्रास, कंकणाकृती, किंवा खूप दुर्मिळ असे संकरीत सूर्यग्रहण. जेव्हा एकाच प्रतलात पृथ्वी-चंद्र-सूर्य एका रेषेत येतात तेव्हा चंद्राची छाया पृथ्वीच्या काही भागावर पडते. ज्या भागांवर मध्यवर्ती गडद काळी छाया (उंबरा) पडते, तिथून खग्रास सूर्यग्रहण दिसते. सभोवताली थोडी कमी दाट असलेली छाया (पेनुम्ब्रा) पडते. अश्या भागांतून आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. चंद्र कधी पृथ्वीच्या जवळ असतो तर कधी दूर. दूर गेल्यावर चंद्राचा व्यास काही प्रमाणात कमी भासतो. अशा वेळी जर चंद्र पृथ्वी-सूर्याच्या मध्ये एका रेषेत आला तर आपल्याला खग्रास सूर्यग्रहण न दिसता कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही आणि सूर्याची बाहेरची कडा सोनेरी बांगडीसारखी दिसते.

सर्वसामान्य लोकांसाठी सूर्यग्रहण हा एक विस्मयकारक अनुभव ठरू शकतो. खग्रास सूर्यग्रहणात तर कधी न दिसणारे सूर्याचे वातावरण आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो. कंकणाकृती सूर्यग्रहणाचा अनुभवदेखील खूप चित्तवेधक असतो. पण हा आनंद लुटताना, आपण नुसत्या डोळ्यांनी ग्रहण पाहणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. कंकणाकृती सूर्यग्रहणातसुद्धा सूर्याचे तेज एवढे असते की नुसत्या डोळ्यांनी पाहिल्यास आपल्याला कायमचे अंधत्व येऊ शकते. ग्रहण पाहण्याचे विशेष चष्मे उपलब्ध आहेत. त्याचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच जर दुर्बिणीच्या सहायाने आपण ग्रहण पाहणार असाल तर दुर्बिणीचे सौर फिल्टरसुद्धा उपलब्ध असतात. बऱयाचदा वापरलेल्या जुन्या एक्स-रे फिल्ममधून आपण ग्रहण पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सूर्याचे तेज कमी झाल्याचे भासते, पण प्रत्यक्षात सूर्यापासून येणारी इंफ्रारेड किरणे आपल्या डोळ्यांना इजा करू शकतात. त्यामुळेच पूर्ण तयारीनिशीच आपण येत्या 26 डिसेंबरला या तेजोमय कंकणाकृती सूर्यग्रहणाचा आनंद नक्की घेऊया!

[email protected]