
सामना प्रतिनिधी । मुंबई
छोटय़ा पडद्यावरचा प्रतिष्ठत समजला जाणारा झी रिश्ते पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यात ’इश्क सुभान अल्लाह’ या मालिकेतील वडीलांच्या भूमिकेसाठी अभिनेते सुनील पुष्करणा यांनी सर्वोत्कृष्ट वडीलांचा पुरस्कार पटकावला आहे. या मालेकेत त्यांनी साकारलेली ‘काझी इरफान सिद्धिकी’ ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
सुनील पुष्करणा यांनी 1984 साली आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला. गोरखपूरच्या दीनदयाल विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी ‘अंधयुग’, ‘कथा एक कंस की’ अशा नाटकांमधून आपल्या दमदार अभिनयाचे प्रदर्शन करत आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे जगाला दाखवून दिले. पुढे रंगभूमीवर नावलौकिक मिळवण्यासाठी त्यांनी लखनऊ गाठले. ‘जिस लाहोर नही देख्या’, ‘बाबूजी’, ‘चेंगेज खान’, ‘हॅम्लेट’ अशा नाटकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. पुढे थिएटर आर्ट्समध्ये डिप्लोमा करण्यासाठी सुनील यांनी थेट दिल्ली गाठले. तिथे गेल्यानंतर ‘नझारे दरमियॉन है’, ‘छोटी सी भूल’, ‘ऑंखे’ आणि ‘दंभ’ या दूरदर्शनवरील लघुपटात त्यांनी काम केले.
रंगभूमीप्रमाणे छोटा पडदाही त्यांनी गाजवला.अॅण्ड टीव्हीवरील ‘एक विवाह ऐसा भी’ या मालिकेत साकारलेल्या ताओजीच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. मैशासूर, बॅटल ऑफ सारागढी, किशन सिंह या मालिकांत त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले.



























































