उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात स्वीकारला पदभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवार यांच्या राजकीय उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारीला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सुनेत्रा पवार यांना अजितदादांकडील वित्त आणि नियोजन हे खाते वगळता उर्वरित सर्व खाती देण्यात आली आहेत.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार आज पहिल्यांदा मंत्रालयात आल्या. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील दालनात त्यांनी आज खात्याची सूत्रे स्वीकारली. त्यापूर्वी त्यांनी दालनातील अजित पवार यांच्या खुर्चीला नमस्कार केला. या वेळी सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या आठवणींनी भावुक झाल्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार आदी उपस्थित होते.

 पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले.

धनंजय मुंडेंनी पार्थ पवारांना उठवले

या वेळी धनंजय मुंडे हे पार्थ पवारांच्या खुर्चीच्या मागे उभे होते. त्यांनी पार्थ पवार यांना खुर्चीतून उठवले आणि धनंजय मुंडे सुनेत्रा पवार यांच्या पाया पडले. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर जोरात व्हायरल झाला आहे.